पारधी बेड्यावरील टिनपत्रे उडाली : रात्रभर निवासाचा प्रश्न ऐरणीवरसमुद्रपूर/हिंगणघाट : उन्हापासून मुक्ती मिळावी म्हणून सर्वत्र मान्सूनची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच बुधवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळाचा हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याला चांगलाच फटका बसला. हिंगणघाट तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. शिवाय झाडे उन्मळून पडली तर समुद्रपूर तालुक्यात अनेकांच्या घरांची अंशत: पडझड झाली.समुद्रपूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या इटलापूर पारधी बेडाजवळील घराचे व काही झोपड्यांची टिनपत्रे उडून गेल्या. यामुळे त्यांचे अन्नधान्य, कपडे यांचे मोठे नुकसाने झाले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने बेड्यावरील लक्ष्मण पवार, राजू भोसले, चंद्रशेखर राऊत, जामतीस राऊत, चंद्रकुमार पवार, विठ्ठल पवार, शिवा पवार, प्रेम पवार, नेत्रजीवन पवार, शषमीला राऊत, धनराज पवार, राजू राऊत यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या घराजवळील सर्व टिना तसेच त्यांच्या कोबंड्याचे बेंदेही उडून गेले. यामुळे काही कोंबड्या मरण पावल्या. याबाबत जामतीस राऊत व ददोबा पवार यांनी तलाठ्यांना माहिती दिली. त्यांनी तहसीलदार यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता गुरूवारी येऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. पारधी बेड्यावर सध्या रात्री राहण्याचीही सोय नसल्याने तेथील कुटुंब उघड्यावर आले आहे. या वादळी वाऱ्यामुळे जाम रोडवरील रेणकापूर गावाजवळ लिंबाचे झाड पडून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात अन्य गावांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला.हिंगणघाट तालुक्यातही अनेक गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांची घरे अंशत: क्षतिग्रस्त झाली. वादळामुळे झालेल्या नुकसानाची तहसीलदार, तलाठी यांनी पाहणी करून ग्रामस्थांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)
हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्याला वादळाचा फटका
By admin | Published: June 11, 2015 2:03 AM