पपई, संत्रा, केळी व फणसाच्या बागांंचे नुकसान : बाजार समितीत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची धावपळवर्धा : आठवड्याची उसंत देऊन जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. पावसाचे कुठलेही संकेत नसताना सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्याने सर्वांची धावपळ झाली. जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी सतत आठवडाभर आलेल्या पावसामुळे रबी पीक हातचे गेल्याचे चित्र होते. यात शुक्रवारी रात्री पुन्हा आलेल्या पावसाने या नुकसानीत भरच टाकल्याचे बोलले जात आहे.या पावसाचा फटका जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना अधिक बसल्याचे दिसून आले. पपई, संत्रा, केळी व फणस बागायतदारांचे नुकसान झाले. सेलू बाजार समितीत मोजमाप करण्याकरिता उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य ओले झाले. अचानक आलेल्या पावसामुळे ते धान्य झाकण्याची त्यांना संधीही मिळाली नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ते धान्य होते त्यांना या पावसामुळे चांगलाच फटका बसला. वर्धेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तीच स्थिती दिसून आली. येथेही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचे बरेच धान्य ओले झाल्याचे दिसून आले. यामुळे येथे रविवारी आपले धान्य आपल्या गोदामात पोहोचविण्याकरिता व्यापाऱ्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. आकोली येथेही पावसाने हजेरी लावली. मदनी येथील शेतकरी भास्कर वंजारी यांनी त्यांच्या शेतात अॅपल बोर व फणसाची लागवड केली होती. या पावसाचा त्यांना चांगलाच फटका बसला.
जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा तडाखा
By admin | Published: March 14, 2016 2:04 AM