देवळी (वर्धा) : विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनावर समोरून येणाऱ्या दोन चारचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात भंडारा येथील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले.
हा अपघात देवळी ते वर्धा मार्गावर बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शेतकी शाळेजवळ झाला. सुधाकर चव्हाण (रा. भंडारा) असे मृतक सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मालवाहू ट्रकचालक अंकुश केने आणि १६ चाकी चालक रामेश्वर (रा. राजनांदगाव, छत्तीसगड) अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, (एमडब्ल्यू पी ८५६१) मालवाहू मिनी ट्रकचा चालक अंकुश केने वाहन निष्काळजीपणे चालवित विरुद्ध दिशेने देवळीकडे जात होता. दरम्यान, देवळीकडून वर्ध्याकडे येणारा (सीजी ०८ एटी ३३२१) क्रमांकाचा सोळा चाकी मालवाहू ट्रक आणि (एएच ३६ झेड ७५८९) क्रमांकाची कार या दोन्ही गाड्यांसमोर मिनी मालवाहू ट्रक आल्याने दोन्ही वाहने अनियंत्रित होऊन मिनी ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला खोल खाईत जाऊन आदळल्या.
या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, कारचालक सुधाकर चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर १६ चाकी चालक रामेश्वर आणि मिनी मालवाहू ट्रकचालक अंकुश केने हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळतांच सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. पंचनामा करून जखमींना रुग्णालयात पाठविले असून, आरोपी मिनी मालवाहू ट्रकचालक केने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.