वर्धा : शहरातील मोक्याच्या आणि मोठ्या जागा सध्या अडगळीत पडलेल्या दिसतात़ महाविद्यालयांच्या रांगेतील जागा सध्या पडक्या इमारती राखत आहे़ या जागेवर कधीकाळी महाराष्ट्र शासनाचे पशुधन विकास अधिकारी कार्यालय व कृत्रिम रेतन केंद्र होते़ सध्या या परिसरात पडक्या इमारती असून त्या व्यसनींच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत सदर जागेचा दुसऱ्या कामासाठी वापर करावा, अशी मागणी सामान्यांच्यावतीने करण्यात येत आहे़ जिल्ह्याचे केंद्र असलेल्या वर्धा शहरात सर्व शासकीय कार्यालये आहेत़ गत काही वर्षांपर्यंत अनेक कार्यालये भाडेतत्वावर होती़ आजही अनेक कार्यालयांना स्वत:ची इमारत नाही़ शहरात शासकीय जागा नसल्याने कार्यालयांना इमारती नाहीत, असे नव्हे तर केवळ प्रशासकीय उदासिनतेमुळे अनेक कार्यालयांना खितपत भाडेतत्वावरील इमारतीत कामकाज आटोपावे लागत आहे़ शहरात पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, कृषी विभाग, पशुधन विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत़ असे असताना बहुतांश कार्यालये भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यरत आहेत़ महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास अधिकारी कार्यालयाकडे जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या शेजारी मोठी जागा आहे़ या जागेवर इमारतींचे जुने बांधकामही आहे़ सध्या या इमारती जीर्ण झाल्या असून छत बेपत्ता झाले आहे़ काही इमारतींच्या केवळ भिंती शिल्लक आहेत तर काहींच्या त्याही तुटलेल्या अवस्थेत आहेत़ येथील पशुधन विकास अधिकारी कार्यालय शिवाजी चौक येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीतच स्थानांतरित करण्यात आले आहे़ यामुळे सदर जागा दुसऱ्या विभागाला हस्तांतरित करणे वा पशुविकास विभागाच्या अन्य कामकाजासाठी तिचा उपयोग होणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ ही जागा सध्या पडक्या इमारतींमुळे अवैध व्यवसायांचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे़ सध्या या परिसरात मोकाट गुरांचा मुक्त संचार असतो़ शिवाय पडक्या इमारतींमध्ये गांजा व अन्य मादक पदार्थांचे सेवन करणारे व्यसनी आढळून येतात़ मद्यपिंकरिताही ही जागा सुरक्षित स्थळ ठरल्याचेच दिसून येते़ संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर जागेचा योग्य वापर करणे व पोलिसांनी लक्ष देत अवैध व्यवसायावर आळा घालणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
पडक्या इमारती व्यसनींच्या पथ्यावर
By admin | Published: March 30, 2015 1:43 AM