प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्क सेलू (वर्धा): तालुक्यातील चारमंडळ या छोट्याशा गावात तब्बल ४० कोविडबाधित सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ४० पैकी ३५ कोविड बाधितांना जि. प. शाळेत तर उर्वरित पाच कोविडबाधितांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. याच कोविड बाधितांनी एकजुटीचा परिचय देत जिल्हा प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या गावात एकही ॲक्टिव्ह कोरोनाबाधित नसून ४० पैकी एकाही कोविड बाधिताला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही, हे विशेष.
गावात तब्बल ४० कोरोनाबाधित सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून गावात कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात आला होता. तर ४० पैकी ३५ कोरोनाबाधितांच्या घरी गृह अलगीकरणासाठी वेगळी व्यवस्था नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले होते. तर उर्वरित पाच कोरोनाबाधित स्वतःच्या घरी अलगीकरणात होते. प्रत्येक कोविड बाधिताने अलगीकरणाच्या काळात काय करावे, याची माहिती या कोरोनाबाधितांना देण्यात आली. त्यानंतर या कोरोनाबाधितांनी आपल्या शरीरात आणि गावात एन्ट्री केलेल्या कोरोनाला हद्दपार करण्याचा दृढ निश्चय करून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले.
दररोज व्हायची आरोग्य तपासणीगृह अलगीकरणासह जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या प्रत्येक कोविड बाधिताची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी केली जात होती. शिवाय त्यांनी काय खबरदारी घ्यावी याचीही माहिती रुग्णांना दिली जात होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली.
दक्षता पाळत कुटुंबीयच द्यायचे जेवणाचा डबाजिल्हा परिषदेच्या शाळेत अलगीकरणात असलेल्या कोविड बाधितांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाविषयक दक्षता पाळत दररोज दोन्ही वेळच्या जेवणाचा डबा रुग्णांना नेऊन देत होते. यामुळे कोविड बाधितांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे रोज दुरून दर्शनही व्हायचे. याचाय सकारात्मक परिणाम कोविड बाधितांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी झाल्याचे बोलले जात आहे. ९०० लोकसंख्येचे चारमंडळ, ३५० लोकसंख्येचे धपकी व ७१३ लोकसंख्येचे धपकी बेडा असे तीन गावे मिळून चारमंडळ ही गटग्रामपंचायत आहे. त्यापैकी एकट्या चारमंडळ गावात ४० कोविड बाधित सापडले होते.
लग्न ठरले कोविड ब्लास्टसाठी कारणीभूतnचारमंडळ येथील काही व्यक्ती लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शविण्यासाठी गेले होते. पण गावात परतल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी कोविड चाचणी केली. त्यांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच इतरांनीही कोविड चाचणी केल्यावर तब्बल ४० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. nएकूणच लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शविणे हे चारमंडळ गावात कोविड ब्लास्टसाठी कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. सध्या या ठिकाणचा कंटेन्मेंट झोन उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशान्वये हटविण्यात आला आहे.
तब्बल ४० कोविडबाधित सापडल्याने गावात दहशत पसरली होती. आरोग्य, महसूल व पोलीस विभागासह शिक्षकांनी सहकार्य केले. पाच व्यक्तींना गृह अलगीकरणात तर ३५ कोरोनाबाधित व्यक्तींना शाळेत ठेवण्यात आले होते. एकजुटीने केलेल्या प्रयत्नाअंती गाव सध्या कोरोनामुक्त झाले आहे.- नीता शेळके, सरपंच, चारमंडळ