वर्धा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंगे आंदोलनाचा फटका आता लग्नसमारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाजणारे भोंगे आणि डीजेंनाही बसणार आहे. अशा कार्यक्रमांमध्ये ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळली जाते की नाही, याची तपासणी पोलिसांच्या वतीने केली जाणार आहे. तशी मोहीमही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मर्यादेच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांद्वारे मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवर वाजणाऱ्या भोंग्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाेलिसांचे काम चांगलेच वाढले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच भोंगे काढण्याचे निर्देश दिले आहे. तसेच आवाजाची मर्यादाही ठरवून दिली आहे. त्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोंगे वाजवायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. विनापरवानगी भोंगे वाजविल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या भोंगे आंदोलनाची झळ सर्वांनाच बसू लागली आहे. केवळ धार्मिक स्थळांवरच नव्हे तर लग्नसोहळ्यांमध्ये वाजणाऱ्या डीजे आणि भोंग्यांवरही चाप लागणार आहे हे मात्र तितकेच खरे.
डीजे साहित्य जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
चंद्रशेखर लेआऊट सिंदी मेघे परिसरात एका घरगुती कार्यक्रमात मोठ्याने डीजेवर गाणे वाजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विनापरवानगी सुरू असलेला डीजे बंद करून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करून डीजे साहित्य दोन टॉप, बेस, लॅपटॉप, मिक्सर जप्त करण्यात आले. ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली असून जयपाल काशिनाथ भस्मे, नितीन नामदेव वाघमारे व एकाविरुद्ध कलम ३६ तसेच कलम १३४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.