लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदारांच्या पुण्याईने जिल्हा परिषद सभागृहात पाय ठेऊन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आरोग्य आणि शिक्षण समितीचे सभापतीपद देऊन मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. कोणताही अनुभव पाठीशी नसताना सर्व सदस्यांच्या व आप्तेष्ठांच्या सहकार्याने अडीच वर्षाच्या कालावधीत या पदाला न्याय देतांना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण आणि रुग्णांना आरोग्यदायी जीवन देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, असे मत जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती जयश्री सुनील गफाट यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व समिती सभापतींचा कार्यकाळ संपत आला असून येत्या ६ जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री गफाट यांनी पत्रकारांशी संवाद साधून अडीच वर्षाच्या कार्यकाळातील कामाचा लेखाजोखा मांडला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून पुर्वी ७० लाखांचाच निधी दिल्या जात होता. पण, गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत १३ कोटींचा निधी प्राप्त करुन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक व बौद्धीक विकासाला चालना देण्यात आली. त्यासोबतच ग्रामपंचायतींच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील ८२१ शाळाही डिजिटल करण्यात आल्या आहे.या सोबतच आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळताचा अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम सेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली. या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जबाबदारीची जाणीव नसलेल्या शिक्षण विभागातील आठ शिक्षक तर आरोग्य विभागातील एका कर्मचाºयावर कारवाई करण्यात आली, असेही गफाट यांनी परिषदेत बोलताना सांगितले. याकरिता तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्यासह सर्व सभापती, सदस्य व अधिकारी, कर्मचाºयांचे मोठे सहकार्य मिळाल्याचेही सभापती जयश्री गफाट यांनी सांगितले. यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, सुनील गफाट यांच्यासह इतर अधिकारी आणि पदाधिकाºयांची उपस्थिती होती.या आहेत अडीच वर्षातील उपलब्धीदहा कोटींच्या खर्चातून शाळांमध्ये भौतिक सुविधा देऊन ‘सुर नवा ध्यास नवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून कॉन्व्हेंटकडे जाणारे दीड हजार विद्यार्थी झेडपीच्या शाळांमध्ये दाखल झाले. शाळांना विद्युत देयक भरण्याची सोय करुन देत सर्व शाळा सौरउर्जेवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता जाण्यासाठी २ लाख रुपयाचा निधी उपलब्ध दिला. स्काऊट गाईडकरिता १ लाख व प्रज्ञाशोध परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता १ लाखाचा निधी देण्यात आला. जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाने मानांकनही मिळाले आहे. या कालावधीत तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आंजीला ग्रामीण आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता पुर्वी ४०० रुपये मिळायचे आता ६०० रुपये दिल्या जात आहे.