कारंजा (घा.) : तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ कर्मचाऱ्यांवर तर एमएससीआयटी प्रशिक्षण घेण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते़ हे प्रशिक्षण न घेतलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखली जाते; पण संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना बसची पास मिळत नाही़ यामुळे गरीब, गरजू विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते़ शासन एकीकडे संगणकीय शिक्षणाला काळानुरूप महत्त्व देत आहे़ असे असताना राज्य परिवहन महामंडळ हे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बस सवलत पास देण्याचे नाकारत आहे़ याद्वारे विद्यार्थ्यांवर अन्यायच होत असल्याचे दिसते़ शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करण्याचे कार्य सध्या परिवहन महामंडळ करताना दिसते़ शहरात दोन अधिकृत शासनमान्य व एमकेसीएल पुरस्कृत संगणकाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या दोन्ही संस्थांमध्ये दररोज २०० च्या आसपास विद्यार्थी ग्रामीण भागातून येथे येतात़ यातील बहुतांश विद्यार्थी गरीब घरातील; पण होतकरू आहेत़ काही शेतकऱ्यांची मुले आहेत. या विद्यार्थ्यांना बसची सवलत पास नाकारली जात असल्याने अधिक पैसे खर्च करून बसने प्रवास करावा लागतो़ काही विद्यार्थी पैसे वाचविण्याकरिता अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत असल्याचे दिसते़ हा प्रवास जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतो़ या अवैध प्रवासात अपघात होऊन जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शिक्षणासाठी मोफत पास देण्याची परिवहन महामंडळाची योजना आहे; पण संगणक शिक्षणासाठी ती सवलत दिली जात नाही़ यामुळे एस.टी. महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून संगणकीय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पास देण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)
संगणकाचे विद्यार्थी एसटी पासपासून वंचित
By admin | Published: April 10, 2015 1:41 AM