पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही : अनेक बसस्थानकांचीही स्थिती चिंताजनकवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे म्हणत बससेवा पुरविली जाते; पण हा प्रवास कालौघात दु:खाचा झाल्याचे चित्र आहे. भंगार बसेस, दुरवस्थेत असलेली बसस्थानक, प्रवासी निवारे आणि असुविधांचा बाजार यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. जिल्ह्यातील निवाऱ्यांची दुरवस्था आणि असुविधांनी तर विद्यार्थ्यांचा जीवच टांगणीला लागला आहे. यात विद्यार्थी रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत असल्याचे पाहावयास मिळते.राज्य परिवहन महामंडळांकडून मोठी गावे, शहरांमध्ये बसस्थानकाची तर रस्त्यावरील गावांसाठी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून बसची प्रतीक्षा करण्यासाठी छप्पर उपलब्ध करून देण्यात आले; पण त्याच्या देखभाल, दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी, सध्या बहुतांश बसस्थानके आणि प्रवासी निवारे भग्नावस्थेत आढळून येतात. अद्याप अनेक गावांसाठी तर प्रवासी निवाऱ्यांची सोयही करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांना निवाऱ्यांची सुविधा देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. काही ठिकाणी निवारे आहेत तर असुविधांनी कळस गाठला आहे. राज्य परिवहन महामंडळाने या संपूर्ण प्रकारांकडे लक्ष देत निवाऱ्यांची दुरूस्ती करणे व नवीन निवारे उभारणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
बसथांब्यावर विद्यार्थ्यांची घुसमट
By admin | Published: September 28, 2016 1:59 AM