लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांकरिता शहरात नालवाडी आणि रामनगर येथे दोन वसतिगृह आहे. यातील नालवाडी येथील इमारत राहण्यायोग्य नसल्याने विद्यार्थ्यांना सभागृहातच ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता नव्याने बांधलेले आयटीआय टेकडी परिसरातील वसतिगृह गाठले व ठिय्या मांडला. नवीन इमारत मिळेपर्यंत येथेच उघड्यावर राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. असे असले तरी सायंकाळपर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी तिकडे भटकला नाही.नालवाडी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात १२५ विद्यार्थी आहेत. येथे विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जुने वसतिगृह राहण्यायोग्य नसल्याने नवीन इमारत बांधण्यात आली; पण काम पूर्ण होऊनही ती हस्तांतरित करण्यात आलेली नाही. परिणामी, तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना वसतिगृहात असुविधांचा सामना करीत राहावे लागत आहे. या वसतिगृहात एकच स्रानगृह असल्याने महाविद्यालयात जाण्यास विलंब होतो. ४० ते ५० विद्यार्थ्यांना राहण्याकरिता केवळ आठ खोल्या आहेत. रात्री मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले असून त्यांनी घरचा रस्ता धरला आहे. सदर वसतिगृहात काम सुरू असल्याने दिवसभर ग्रेनाईडच्या मशीनचा आवाज येतो. परिणामी, अभ्यास होत नाही. जुन्या वसतिगृहाची अर्ध्यापेक्षा जास्त इमारत पाडण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.जुन्या इमारती सुविधायुक्त नसल्याने आयटीआय टेकडी परिसरात नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत; पण अद्यापही त्या पूर्ण करण्यात आल्या नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना जुन्या वसतिगृहात खितपत जगावे लागत आहे. आहाराकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त नागपूर यांना निवेदन दिले; पण दोन महिने लोटूनही कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने अखेर सोमवारी विद्यार्थ्यांनी नवीन वसतिगृहाची इमारत गाठून कुलूपबंद दारासमोर ठिय्या मांडला. वृत्त लिहिस्तोवर अधिकारी आले नव्हते.वीज जोडणी न दिल्याने रखडले वसतिगृहाचे हस्तांतरणसार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी (मेघे)(जुने) तथा नवीन या दोन इमारतींचे बांधकाम करण्यात आले. जुन्या वसतिगृहाच्या बांधकामावर २ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये तर नवीन वसतिगृहाच्या बांधकामावर २ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. दोन्ही बांधकामे २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली; पण अद्यापही ही वसतिगृहे हस्तांतरित करण्यात आलेली नाहीत. या वसतिगृहांमध्ये अद्यापही वीज जोडणी करण्यात आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वास्तविक, डीपी लावली; पण वीज जोडणी का केली नाही, हा प्रश्नच आहे. यामुळे नवीन वसतिगृह अद्यापही विद्यार्थ्यांना खुले करण्यात आलेले नाही. विद्यार्थी नवीन वसतिगृहात आले असता वॉर्डन व अन्य कर्मचारी जुन्या वसतिगृहातच चर्चा करीत असल्याचे सांगण्यात आले.अधिकाºयांचा कानाडोळानालवाडी येथील वसतिगृहातील विद्यार्थी आयटीआय टेकडी परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या वसतिगृहासमोर बसून असल्याची माहिती मिळताच ही बाब जि.प. अध्यक्षांना सांगण्यात आली. यावरून त्यांनी महावितरणमध्ये दूरध्वनीद्वारे अभियंत्यांना पाठवून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासह वीज पुरवठा त्वरित देण्याच्या सूचना दिल्या; पण सायंकाळपर्यंत अभियंता दाखल झाला नव्हता. अन्य अधिकाºयांनीही कानाडोळा केल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाचीही समस्या निर्माण झाली होती.
अपूर्ण वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:24 PM
आदिवासी विद्यार्थ्यांकरिता शहरात नालवाडी आणि रामनगर येथे दोन वसतिगृह आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : तीन महिन्यांपासून सुविधांचा अभाव