चिकणी (जामणी) : गावातील बरेच विद्यार्थी देवळी येथे शिक्षणाकरिता ये-जा करतात. त्यांना महाविद्यालय गाठण्याकरिता परिवहन महामंडळाच्या बसगाडीचाच पर्याय आहे; मात्र महामंडळाची बस वेळेवर येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी येथील बसस्थानकावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुलगाव येथील आगार प्रमुखांनी येत चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी आणखीच चिडले. यामुळे देवळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मदने यांनी घटनास्थळ गाठत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी यावर मार्ग काढण्याकरिता आगार प्रमुखांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतल्याने या मार्गाची वाहतूक सुरळीत झाली. चिकणी व जामणी हे दोन्ही गाव देवळी वरून पाच कि़मी. अंतरावर आहे. या दोन्ही गावचे विद्यार्थी देवळी येथे शिक्षणाकरिता जातात; परंतु अनियमित बससेवेमुळे त्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराकडे आगार व्यवस्थापकांनी लक्ष देण्यास कुचराई केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी रोखली एसटी
By admin | Published: September 16, 2016 2:52 AM