जि.प. शाळांत मोहिमेतून जनजागृती लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील नवीन पिढी तंबाखूमुक्त राखण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये जिल्हा परिषद वर्धा व प्राथमिक शिक्षण विभागाने सलाम मुंबई फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल्स लि. यांच्या सहकार्याने तंबाखूमुक्त शाळा अभियान जि.प. शाळांत यशस्वीपणे राबविले. याचाच एक भाग म्हणून मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळांत दररोज परिपाठास तंबाखूमुक्त जीवनाची शपथ दिली जाणार आहे. १ मे रोजी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी वर्धा जिल्हा जगातील दुसरा तंबाखूमुक्त जि.प. शाळांचा जिल्हा घोषित केला आहे. यात सातत्य राखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले जात आहे. जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. शाळेने तंबाखूमुक्त शाळेचे सर्व निकष अबाधित राखणे आवश्यक आहे. याची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांची राहणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभांत तंबाखूमुक्त शाळेच्या निकषाचा पाठपुरावा करणे गरजेचे राहणार आहे. पंचायत समितीचे केंद्रप्रमुखही आपल्या शाळांच्या भेटीमध्ये तंबाखूमुक्त शाळेच्या निकषाच्या पूर्ततेबाबत काटेकोरपणे पाहणी करणार आहे. रजिस्टरमध्ये तशी नोंद केली जाणार आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास गटशिक्षणाधिकारी त्वरित कार्यवाही करतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी दिली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवसापासून हा उपक्रम राबविला जात असल्याने विद्यार्थी व पालकांत जनजागृती होणार आहे.
विद्यार्थ्यांना देणार तंबाखूमुक्त जीवनाची शपथ
By admin | Published: June 28, 2017 12:57 AM