सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे. यात शेतातील उभे तूर पीक पिवळे पडून वाळू लागले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.आर्वी उपविभागात मागील वर्षी तूर उत्पादकांना समाधानकारक उत्पादन झाले. यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागला; पण यंदा थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने याचा थेट परिणाम तूर पिकावर होत आहे. ऐन हातातोंडाशी आलेले तूर पीक वाळत असल्याने या अज्ञात रोगाने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कपाशीनंतर नगदी व कमी खर्चाचे पीक म्हणून तुरीची ओळख आहे; पण अज्ञात रोगामुळे तूर पीक पूर्णत: वाळत आहे. बहुतांश शेतातील तूर पीक पिवळे पडले असून शेंगा वाळत आहे. शेंगा भरत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याचेच दिसते. तालुक्यातील वाठोडा, अहिरवाडा, वागदा, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), देऊरवाडा, माटोडा, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, नांदपूर, शिरपूर (बो.), जळगाव, वर्धमनेरी, मांडला, खुबगाव, पिंपळखुटा, गुमगाव, दहेगाव (मु.), रोहणा, धनोडी, रसुलाबाद, विरूळ (आ.), बाजारवाडा, हरदोली, पांजरा यासह तालुक्यातील सर्वच तूर उत्पादक शेतकºयांच्या शेतात या अज्ञात रोगाची लागण झाली आहे.कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक बजेट कोसळले. लागवड खर्चही निघाला नाही. आत तूर पिकावरही अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयाच्या शेतातील उभे पीक वाळत असल्याने तूर पिकही शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत.माझ्या शेतातील तीन एकराचे तूर पीक अज्ञात रोगाने वाळत आहे. तूर पिवळी पडली असून संपूर्ण झाडे वाळताना दिसतात. कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून मदत देणे गरजेचे आहे.- शिवदास शेंडे, तूर उत्पादक शेतकरी, निंबोली (शेंडे), आर्वी.आर्वी उपविभागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पीक पिवळे पडून वाळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. कृषी विभागाद्वारे तातडीने उपाययोजना केल्या जातील.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.
कपाशीनंतर उपविभागातील तूर उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:26 PM
बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे.
ठळक मुद्देशेतातील पीक पिवळे पडून वाळतेय : शेतकºयांमध्ये धास्ती