हरित सेना शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा : सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम सेवाग्राम : महाराष्ट्रातील हरित सेना शिक्षकांच्या कार्यशाळा घेवून तज्ज्ञांकडून शिक्षकांना मार्गदर्शन केल्या जाते. पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढे समाजात पोहचतो. त्यामुळे शिक्षकांना याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्याने झाडे लावण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण केले असले तरी ही मोहीम एवढ्यावर न थांबता कामा नये. पर्यावरण घटकांवर अधिक जनजागृती करावी लागणार, असे प्रतिपादन सामाजिक वनिकरणचे उपसंचालक राजीव पवार यांनी केले. सामाजिक वनीकरण विभाग, तर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय हरित सेना शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव पवार होते. मंचावर सहाय्यक के.वाय. तळवेकर, मार्गदर्शक म्हणून भारती विद्यापीठ पुणे येथील अजिंक्य भटकर होते. मान्यवरांचे रोपटे देवून बी.डी. खडतकर यांनी स्वागत केले. पर्यावरणाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तापमान वाढत आहे. याचा फटका आपण पण सहन करतो. संकटे निर्माण झाली. आता अंमलबजावणी करणे आणि भावी पिढीला मार्गदर्शन व कार्यरत ठेवण्याची वेळ आली आहे. सण, उत्सवातून अधिक प्रचार व प्रसाराचे काम व्हावे तसेच समन्वयकांना अधिक कृतिशील होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरेल, असे पुढे बोलताना पवार म्हणाले. मार्गदर्शक अजिंक्य भटकर यांनी शिक्षक, समन्वयक यांच्यासोबत संवास साधला. पर्यावरण विषयाची व्याप्ती मोठी आहे. झाडे लावा, संवर्धन करा ऐवढेच हरितसेनेचे काम नसून याविषयी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शिक्षकाने आपली शाळा हरित आहे, का यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या हरित सेनेतील कामाचा आढावा घेण्यात आला. शिक्षक उत्साही व अभ्यासू असेल तर विद्यार्थ्यांना कार्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. शिक्षकांनी काम करताना माहिती, नोंदी ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वा सदस्यांना प्राणी, पक्षी, पाणी, झाडे, वनौषधी याची नोंदवहीमध्ये माहिती संकलीत करण्याची सवय लावावी. जेणेकरून नोंदीसोबत ज्ञान, जिज्ञासा, आवड निर्माण होवू शकते. अलीकडे या क्षेत्रात येण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. करिअरची संधी आहे. शिक्षक व सदस्यांनी हरिअसेना प्रकल्पावर भर द्यावा. शाळा, गावकरी, ग्रा.पं. चा सहभाग वाढावा. पर्यावरणासाठी कृतिशील कार्यक्रमाची गरज असल्याचे भटकर म्हणाले. यानंतर वसंत डुम्पलवार, शोभा बेलखोडे यांनी मनोगत व्यक्त केले. हरित सेनेच्या कार्यशाळा किंवा सभा बोरधरणसारख्या निसर्गरम्य ठिकाणी घेण्यात याव्या अशी मागणी शिक्षकांनी केली. आभार बी.डी. खडतकर यांनी मानले. सहकार्य ए.बी. वंजारी, एस.कांबळे, एम.बी. गायकवाड, एस.एम. रिझवी यांनी केले.(वार्ताहर)
पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा
By admin | Published: January 04, 2017 12:37 AM