लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : येथे वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या जवळपास ३ हजार महिला सदस्यांनी आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये उद्योगांना चालना व रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन सकारात्मक प्रतिसाद दिला.गेल्या पाच वर्षात राज्यात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथुन निघालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तळेगावात पोहाचताच सुधीर दिवे यांच्या नेतृत्वात महिलांनी निवेदन दिले. आर्वी, आष्टी आणि कारंजा हे तालुके उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अतिशय मागासलेले आहेत. रोजगार शोधण्यासाठी थेट शहरात जावे लागते. गेल्या दोन वर्षात दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलाना सदस्य करण्यात आले. महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात गारमेंट्ससह इतर उद्योग निर्माण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना कराव्यात तसेच आपणही आमच्या तिन्ही तालुक्यातील उद्योग निर्मितीसाठी आश्वासन द्यावे. नागपूरच्या धर्तीवर गारमेंट क्लस्टर प्रमाणे आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात गारमेंटस क्लस्टर सुरू करुन येथील प्रशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. यातून आमचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे निवेदनातून नमूद केले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, विधानपरिषद सदस्य अनिल सोले, खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने आदी उपस्थित होते.
रोजगाराच्या मागणीसाठी ३ हजार महिलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:24 PM
येथे वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या जवळपास ३ हजार महिला सदस्यांनी आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यामध्ये उद्योगांना चालना व रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन सकारात्मक प्रतिसाद दिला.
ठळक मुद्देउद्योग निर्मितीची मागणी : गारमेंट क्लस्टरवर दिलाय भर