छत्रपती थुटेच्या मारेकऱ्यांची कबुली : इतर आरोपींचा शोध सुरू समुद्रपूर : गावातील काही व्यक्ती आमच्या कुटुुंबीयांना त्रास द्यायचे व त्या व्यक्तींना छत्रपती थुटे सहकार्य करायचा. त्यामुळे त्याला मारहाण केली असल्याची कबुली छत्रपती थुटेच्या मारेकऱ्यांनी दिल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. छत्रपती थुटे हत्या प्रकरणात हर्षल वाने याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, काही दिवसांपूर्वी गाडी लावणाच्या कारणावरून वाणे कुटुंबीयांसोबत सावरखेडा गावातीलच काहींनी वाद घातला होता. त्यातच त्यांनी वाणे कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रारही केली होती. त्यावेळी मारहाण करणाऱ्यांना छत्रपतीने मदत केली म्हणून त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता. अशातच १६ जुलैच्या दुपारी ३ वाजताच्या दरम्यान छत्रपती थुटे दुचाकीने हिंगणघाटला जात असल्याचे पाहून त्याचा कारने पाठलाग करून उबदाच्या उड्डानपुलावर कारने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवर बसून असणारा भैय्या मोहदुरे हा जखमी झाला. यात छत्रपतीला तेवढी इजा झाली नव्हती; परंतु धडक मारणाऱ्या कारचा टायर फुटल्याने ती कार पुढे जाऊन थांबली, तेव्हा कार कुणाची आहे, हे पाहण्याकरिता छत्रपती हा कारजवळ आला. बेस बॉलच्या दांड्याने मारहाण समुद्रपूर : कारजवळ येत कारमधील युवकाला तू धडक का मारली, असे विचारताच त्यांनी बेसबॉलच्या दांड्याने मारहाण सुरू केली. दरम्यान, दालमिलचे कर्मचारी येताच मारहाण करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. छत्रपती थुटे यांना त्वरित हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्रकृती अत्यवस्थ असल्याने नागपूरला दाखल केले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मारेकऱ्याच्या शोध घेत हर्षल वाणे याला वर्धा येथे अटक केली. पुन्हा दोन आरोपीच्या शोधात पोलीस आहे. आरोपींमध्ये तिघेही सख्ये भाऊ असून पुढील तपास ठाणेदार रणजीतसिंह चव्हाण करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
कुटुंबीयांना त्रास देणाऱ्यांना सहकार्य केल्यावरुन मारहाण
By admin | Published: July 22, 2016 1:46 AM