नागरिक संतप्त : गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार गिरड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल भागवत यांनी मद्यधुंद अवस्थेत केंद्रात चांगलाच धिंगणा घातला. यावेळी त्यांनी अंतर्वस्त्र काढून एका रुग्णाच्या खाटेखाली लोटांगण घालत चक्क झोप घेतली. हा विचित्र प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी सदर वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध रात्री उशिरा २९४, ५०६ व दारूबंदीच्या सहकलम ८५ अन्वये गुन्हा दाखल केला. डॉ. भागवत सोमवारी सायंकाळी सिर्सीवरून येथून धुंदीत आला. त्याच्यासोबत दारूची बाटलीही होती. उपसरपंच विजय तडस व काही ग्रामस्थ एका महिलेच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्याकरिता गेले असता हा प्रकार उघड झाला. त्यांनी लगेच याची माहिती वैद्यकीय अधिकारी सागर गायकवाड यांना दिली. काही वेळात नागरिक जमा झाले. नंतर उपसरपंच व नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वीही डॉ. भागवत यांची येथून हकालपट्टी करण्याचा ठराव गिरड ग्रा.पं. व पं. स. समुद्रपूरने घेतला होता. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. या दोनही प्रकारावरून मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी त्यांना वर्धा मुख्यालयी हलविले होते. तिथेही अधिकाऱ्यांना त्रास वाढल्याने त्यांना परत गिरड येथे पाठविण्यात आले. हा अधिकारी २४ तास धुंदीत राहतो. त्याची तक्रार केल्यास उलट जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून कर्मचारी व ग्रामस्थांना धमक्या देत असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे आरोग्य केंद्रात भीतीचे वातावरण होते. सदर प्रकारात पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी करण्याकरिता अधिकारी वैद्यकीय सागर गायकवाड यांना रक्ताचे नमुने न देता परवानगी आणा, अशी धमकी दिली. या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याला निलंबित न केल्यास मनसे व ग्रामस्थांच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.(वार्ताहर)
दारूच्या नशेतील वैद्यकीय अधिकाऱ्याचा असाही प्रताप
By admin | Published: September 16, 2015 2:43 AM