आवास योजनेचा हप्ता न मिळाल्यानेच आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:36 AM2019-02-07T00:36:11+5:302019-02-07T00:36:59+5:30
पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने देशमुख पुऱ्यातील गोपाल लक्ष्मण इंगोले या युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. याबाबत नगरपालिका प्रशाासन आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
येथील प्रभाग क्रमांक ४ व वॉर्ड क्रमांक १० मधील देशमुख पुऱ्यात राहणाऱ्या गोपाल लक्ष्मण इंगोले याने आत्महत्या केली. गोपालला नगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत घरकूल मिळाले. पहिला हप्ता मिळाल्याने घराचे बांधकाम सुरु केले. घराचे बांधकाम अर्धेअधिक झाल्यावरही बांधकामाचा दुसरा हप्ता मिळाला नाही. त्याने याकरिता पालिकेचे उंबरठे झिजविले पण पैसे मिळाले नसल्याने मजूर व साहित्याचे पैसे कसे द्यावे, या विवंचनेत तो सापडला होता.
त्याने पंधरा दिवसाचा कालावधी मागून साहित्याची खरेदी केली होती.पण, वेळेवर पैसे मिळाले नसल्याने त्याने आत्महत्या केली, असा आरोप काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. हीच परिस्थिती शहरातील इतरही घरकुल लाभार्थ्यांची असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदार व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना काँॅग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता पवन महाजन यांच्यासह सुनिल बासू, सुरेश वैद्य, माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, राजश्री देशमुख, संगिता कामडी, अश्विनी काकडे, निलेश ज्योत, राहूल चकोले, निखिल नरसिंगकर, अशोक राऊत, शिरिष कामडी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.