वर्धा: एक हसता-खेळता छोटासा परिवार होता. आजी-आजोबा, आई-वडील आणि दोन मुले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक वडिलांनी आत्महत्या केली. त्या पाठोपाठ सहा महिन्यांपूर्वी मोठ्या मुलानेही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्यानंतर गुरुवारी १४ वर्षीय थोरल्या मुलानेही घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना बांबर्डा या गावी घडली. दीड वर्षात एकाच परिवारातील तिघांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आर्यन मनोज आत्रात (१४) रा. बांबर्डा, असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनच्या वडिलांनी वर्षभरापूर्वी तर भावाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे आर्यन हा आजी-आजोबासोबत राहत होता. वडील व भाऊ जगातून निघून गेले तर आई सोबत राहत नसल्याने आर्यन तणावात असायचा, असे सांगितले जाते.
अशातच गुरुवारी आजी-आजोबा शेतात कामाकरिता गेले असता घरी कुणीही नसल्याचे पाहून घरातील लोखंडी अँगलला दोराने गळफास घेतला. याची माहिती मिळताच त्याला लागलीच उपचाराकरिता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लक्ष्मण केंद्रे, सतीश नैताम यांनी पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे. आर्यनच्या या आत्महत्येने वृद्ध आजी-आजोबांचा आधार हिरावला. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.