उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील कृषी व्यावसायिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता प्रदीप मधुकर टोटलवार (५३) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळून आले नाही. प्रदीप टोटलवार यांनी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील मित्रांच्या मोबाईलवर संपर्क साधून प्रकृती अस्वस्थेमुळे राष्ट्रीय महामार्गावर आजंती शिवारात पिकअप शेड मध्ये थांबलो असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच भाजपचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे यांच्यासह नगर पालिका पाणी पुरवठा सभापती अंकुश ठाकूर, नगरसेवक चंद्रकांत मावळे, जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, श्याम भीमनवार, संजय डेहने, वामन चंदनखेडे, संजय बोथरा आदी मंडळी शोध घेत रात्रीच तेथे पोहाचली. आजंती शिवारात पिकअप शेडमध्ये टोटलवार अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने रात्रीच त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप टोटलवार हे आ. समीर कुणावार यांचे सहकारी होते. आज सायंकाळी वणा नदीच्या तीरावरील मोक्षधामावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक आणि कृषी व्यावसायी संघाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. टोटलवार यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
कृषी व्यावसायिकाची विष प्राशन करून आत्महत्या
By admin | Published: May 21, 2017 1:03 AM