लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महायुतीतील भाजपने जिल्ह्यातील चारपैकी तीन उमेदवार घोषित केले होते. मात्र, आर्वीचा तिढा कायम होता. सोमवारी पक्षाने तिसऱ्या यादीत आर्वी विधानसभेतून सुमित वानखेडे यांना उमेदवारी घोषित करून विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यावरच डाव उलटवला आहे.
महायुतीत जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी हे चारही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहे. मात्र, भाजपने पहिल्या यादीत केवळ वर्धा, देवळी आणि हिंगणघाटसाठी उमेदवार घोषित केले होते. आर्वीचा तिढा कायम होता. तेथे विद्यमान आमदारांनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याची हूल त्यांनी उठवली होती. समाज माध्यमांवर चला अर्ज भरायला, अशी सादही घातली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी अर्जही दाखल केला. मात्र, त्यांनी अर्ज सादर करताच इकडे भाजपने त्यांच्यावरच डाव उलटवून सुमित वानखेडे यांची उमेदवारी घोषित केली. दरम्यान, मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
आता आर्वीतून पक्षशिस्त पाळत विद्यमान आमदार उमेदवारी मागे घेतात की रिंगणात कायम राहतात, हे ४ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील चारही उमेदवार आता घोषित झाले आहेत. त्यामुळे यावेळी चारही मतदारसंघात रंगतदार लढत होण्याचे संकेत मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे.
आघाडीत बिघाडीचा बिगुल, समीर देशमुख मैदानात महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समीर देशमुख यांनी सोमवारी वर्धा विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथून इच्छुक असताना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर काँग्रेसला उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी पत्रपरिषदेतून केला. येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतही पक्षाने दुर्लक्ष करून काँग्रेसमधून आयात केलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला. दरम्यान, हिंगणघाट मतदारसंघातही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन नेते मंगळवारी नामांकन दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचा बिगुल वाजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.