दोन रुग्णांची नोंद : चिमुकल्यासह महिलेवर उपचार सुरू; आरोग्य यंत्रणेकडून सावधगिरीचा इशारा वर्धा : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. साधारणत: जून ते आॅक्टोंबर महिन्यांत आढळणार हा आजार आहे. मात्र वर्धेत ऐन उन्हाच्या तडाख्याच्या या आजाराचे दोन रुग्ण मिळून आल्याने सर्वत्र चांगलीच खळबळ माजली आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी त्यापासून बचावाकरिता सावधानी बाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. या आजाराचे रुग्ण आढळून येताच आरोग्य विभागाच्यावतीने आपातकालीन सेवा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच वर्षीय चिमुकल्यासह एका ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील एक महिला बाहेर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असून एकावर सावंगी (मेघे) तर दुसऱ्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होऊ नये यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपायासाठी आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. आढळलेल्या स्वाईन फ्ल्यूच्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण जिल्ह्यातील तर दुसरा रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. जिल्ह्यातील रुग्ण वर्धा शहरातील असून जिल्ह्याबाहेरी रुग्ण यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून या आजाराची लागण आणखी कुणालाही होऊ नये यासाठी दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष ताप, घसादुखी किंवा घश्याला खबखव होणे, नाक गळणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, प्रसंगी उलटी व जुलाब होणे ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहे. स्वाईन फ्ल्यू या आजारावर टॅमी फ्ल्यू हे प्रभावी औषध असून शासकीय रुग्णालयातसह जि.प. आरोग्य विभागाकडे हे औषध उपलब्ध आहेत. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रुग्णावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह सावंगी (मेघे) व सेवाग्राम येथील रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. आरोग्य मंत्र्यांनी घेतला नुकताच आढावा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी १५ एप्रिलला सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सुचना दिल्या. त्या सुचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना माहिती देण्यासाठी तसेच विशेष सूचना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उन्हाळ्यात स्वाईन फ्ल्यूने डोके काढले
By admin | Published: April 19, 2017 12:33 AM