सखी मंच वर्धाचे आयोजन : किर्ती आवळे यांनी सादर केल्या दमदार लावण्या वर्धा : लावणी सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या किर्ती आवळे यांनी आपल्या एकापेक्षा एक अश्या दमदार लावण्यांनी वर्धेकरांना अक्षरश: वेडे केले. प्रत्येक लावणीला मिळणाऱ्या टाळ्या व शिटट्यांनी रसिकांची दाद प्रशंसनीय होती. अशा बहारदार कार्यक्रमात रसिकही मोठया प्रमाणात थिरकले. लोकमत सखीसाठी तसेच आमंत्रितांसाठी सुंदरा मनात दिसली च बहारदार कार्यक्रम स्थानिक यमुना लॉनच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. गणपती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रसिकांना मानाचा मुजरा दिल्यानंतर खऱ्या अर्थाने लावण्या सादर करण्यात आल्या ‘या रावजी बसा बरा भाऊजी’, ‘कारभारी दमानं’ यांनी सादर केलेल्या दोन्ही लावण्यांना रसिकांनी शिट्टया व टाळ्याची दाद दिली. ‘बाई मी लाडाची हो लाडाची कैरी पाडाची’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या विविध खड्या व बैठ्या लावण्या त्यांनी सादर केल्या. शेवटी पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची हे भान करीत सैराटच्या झिंग झिंंगाट या गीताने कार्यक्रमाची सांगता केली. यानंतर सखी मंचच्या सदस्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पुनम सुहास पाटील, सुनिता तडस मेहेरे या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुहास पाटील, सखी मंच संयोजिका प्रियंका मोहोड, प्रतिभा वाळके, ज्योती देवतारे, सुनीता बावणेर, अर्चना गोरे, वंदना मंथनवार, योगिता मानकर आदींनी सहकार्य केले. (उपक्रम प्रतिनिधी)
‘सुंदरा मनात दिसली’ ने रसिकांना लावले वेड
By admin | Published: March 11, 2017 12:39 AM