विस्तारीकरणाकरिता नियोजन : नागरिकांसोबत चर्चा वर्धा : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. या कामाची पाहणी आणि विविध प्रश्न सोडविण्याचे नियोजन करण्याकरिता आ.डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास मून, अभियंता महेश मोकलकर, वीरू पांडे, नगरसेवक कैलास राखडे, आशीष वैद्य, आसिफ शेख, अजय वरटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विस्तारीत उड्डाणपूल हॉलीडे रिसोर्टच्या बाजूने ११.५ मीटरने वाढणार आहे. जुना पूल कायम ठेवत या नवीन पुलाची त्याला जोड देण्यात येणार आहे. हॉलीडे रिसोर्टपासून तर बोरगाव मार्गावरील सराफ यांच्या घरापर्यंत हा पूल असणार आहे. देवळी मार्गाने शिवाजी शाळेच्या संरक्षण भिंतीपासून शेवटपर्यंत विस्तारीकरण आहे. बजाज चौकाच्या सभोवताल ६० बाय ६० मीटरचे संपूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील पुलाचा भाग हा डग्बोस्टींग गडर पद्धतीने बांधण्यात येणार आहे. पुलाच्या एका कोपऱ्याच्या पट्टीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बजाज चौक ते सराफ यांच्या घरापर्यंत ८४ मीटर रूंद, तर देवळी मार्गाचा पूल ४२ मीटर रूंद राहणार आहे. जुन्या उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या ४० कुटुंबांच्या झोपड्या तेथून काढून त्यांना अन्यत्र पट्टे देऊन स्थानांतरीत करण्यात येणार आहे. पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हॉलीडे रिसोर्ट आणि शिवाजी शाळेजवळील जलवाहिनी दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. पुलाच्या विस्तारीकरणामुळे शिवनगरवासियांचा रस्ता बंद होत असल्यामुळे त्यांना पर्यायी रस्ता देण्याकरिता नियोजन करण्यात येणार आहे. बजाज चौकापासून तर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत २०० मीटरचा सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच बजाज चौक ते वसंत चित्रपटगृहापर्यंत २०० मीटरच्या मार्गाचे सिमेंटीकरण केले जाणार आहे. या सर्व कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आ.डॉ. पंकज भोयर यांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या.(स्थानिक प्रतिनिधी)
आमदारांकडून उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
By admin | Published: January 04, 2017 12:39 AM