किसान अधिकार अभियानचे आंदोलन वर्धेत किसान अधिकार अभियानच्यावतीने शेतकरी संपाला पाठिंबा देत जिल्हा प्रशासनातील प्रमुखांना झेंडूची फुले देत शेतकरी आंदोलनाला समर्थनाची मागणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सभापती, अधीक्षक कृषी अधिकारी यांना फुले देत जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करीत तीन वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली. याप्रसंगी शेतकरी आंदोलनाचा उद्देश समजावून सांगण्यात आला. शासनाने शेतकरी बांधवांची फसवणूक का केली, याचा जाब विचारण्याबाबत विनंतीही करण्यात आली. जिल्ह्यातील सद्यस्थिती व उपाययोजना काय, याबाबत माहिती देण्यासाठी चार दिवसांची मुदतही यावेळी देण्यात आली. आंदोलनात किसान अधिकार अभियान, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, आम आदमी पार्टी व वर्धा सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
झेंडूची फुले देत मागितले समर्थन
By admin | Published: June 08, 2017 2:24 AM