प्रफूल्ल लुंगे।ऑनलाईन लोकमतसेलू : संपूर्ण महाराष्ट्रात रंगाविना धुळवड साजरे करणारे गाव म्हणजे सुरगाव, अशी गावाची ओळख आहे. २१ वर्षे आदर्श व अभिनव धुलीवंदन साजरे करण्याची परंपरा दरवर्षी व्यापक रूप घेत आहे. यंदाही या गावात रंगाविना धुळवड साजरी होत असून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झालेला आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार व कार्याला सर्वस्व माणणाऱ्या व सप्तखंजेरी वादनाने सर्वांना वेड लावणाºया निस्वार्थ व्यक्तीचे नाव आहे, प्रवीण महाराज देशमुख. ‘आपलं गावच नाही का तिर्थ’ या भजनाचा प्रभाव त्यांच्यावर झाला व सर्वप्रथम २१ वर्षांपूर्वी गावात मित्र व लहान मुलांना घेऊन सामूदायिक प्रार्थनेला सुरूवात केली. आपली मुले इकडे -तिकडे भटकण्यापेक्षा चांगल्या वळणावर लागत आहे, हे ग्रामस्थांना कळायला वेळ लागला नाही. संपूर्ण गावातील सर्व जाती-धर्माच्या प्रत्येक माणसाने या सामूदायिक प्रार्थनेला बळ दिले. नियमित गावात खराटे फिरू लागले. गावातील रस्ते चकाचक दिसू लागले व संपूर्ण सुरगाव हे राष्ट्रसंतांच्या विचाराने झपाटून गेले. आपले गाव इतर गावापेक्षा वेगळे दिसावे. लहान थोरांवर संस्कार व्हावे म्हणून प्रवीण महाराज देशमुख या तरूणाने ग्रामगीता ग्रंथातील प्रत्येक ओवी स्वत: आत्मसात करून सुरगाव वासीयांनाही त्या दिशेने वाटचाल करण्याचा मंत्र दिला. ‘गावागावासी जागवा भेदभाव समुळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे’, या ओवीच मग संपूर्ण ग्रामस्थांनी सार्थ ठरविल्या.२१ वर्षे या गावात रंगाविना धुळवड साजरी होत आहे. तत्पूर्वी सतत तीन दिवस अभिनव धुलीवंदन व संतविचार ज्ञानयज्ञ या उपक्रमात दररोज समाज प्रबोधनपर कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविले जातात. शुक्रवारी या उपक्रमांचा समारोप आहे. गाव नवरीसारखे सजले असून दिवाळीचा आनंद सुरगावात आल्यावर मिळतो. धुळवडीच्या दिवशी सकाळी नामधून निघते. पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर भगवी टोपी तर स्त्रियांही स्वच्छ कपडे परिधान करून सहभागी होतात. तोरण पताकांनी सजलेले गाव, गेट कमानी, स्वागताचे फलक, रांगोळी व प्रत्येक घरासमोर संतांचे फोटो व तेवणारा नंदादीप तेथील माणसांच्या मनाची साक्ष देतो.शिस्तबद्ध पंगतीचे स्नेहभोजनसकाळी नामधून निघाल्यानंतर उभारलेल्या शामियान्यात मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे होतात. गावात येणाºया प्रत्येकाला शिस्तबद्ध पद्धतीने पंगतीचे स्रेहभोजन दिले जाते. रात्री प्रवीण महाराज देशमुख यांच्या सप्तखंजेरी प्रबोधनाने समारोप आहे. हा आनंद सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी दूरवरून नागरिक आले असून घरोघरी पाहुणे मुक्कामी आहेत. सुरगावचा आदर्श इतरही गावांसाठी अनुकरणीय असाच ठरत आहे.
रंगाविना धुळवड साजरे करणारे गाव सुरगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 11:49 PM
संपूर्ण महाराष्ट्रात रंगाविना धुळवड साजरे करणारे गाव म्हणजे सुरगाव, अशी गावाची ओळख आहे. २१ वर्षे आदर्श व अभिनव धुलीवंदन साजरे करण्याची परंपरा दरवर्षी व्यापक रूप घेत आहे.
ठळक मुद्दे२१ वर्षांपासून परंपरा कायम : स्वागत गेट, फलक, पताकांनी सजले गाव