वैद्यकीय जनजागृती मंचात उत्साह : वैयक्तिक सहकार्याची दिली ग्वाही वर्धा : एखादे रचनात्मक कार्य फार काळ दृष्टीआड राहत नाही. त्याची दखल एखादा जाणकार वा प्रशासनातील उच्च अधिकारी घेतो तेव्हा कार्य करणाऱ्यांचा उत्साह वाढतो. असाच अनुभव हनुमान टेकडीवर अचानक जिल्हाधिकारी शैलेश नवाल व न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी भेट देत पाहणी केल्याने वैद्यकीय जनजागृती मंच व श्रमदान करणाऱ्या नागरिकांना आला. गत तीन महिन्यांपासून वैद्यकीय जनजागृती मंच व सहकारी हनुमान टेकडीवर श्रमदान करून ‘जल पुणर्भरण प्रकल्प’ राबवित आहेत. जवळपास ३५० वृक्षांचे रोपण केले असून टेकडी सभोवताल तारांचे कुंपण करण्यात आले आहे. या प्रकल्पात परवानगी घेतल्यानंतर लगेचच सर्व सदस्य कामाला लागले. यासाठी आर्थिक साह्यही लोकसहभागातून प्राप्त होत आहे. जिल्हाधिकारी नवाल यांनी संपूर्ण टेकडी, जल पुनर्भरण प्रकल्प तसेच वृक्षांचे निरीक्षण केले. यावर समाधान व्यक्त केले. सर्व सक्रीय सदस्यांचे कौतुकही केले. या कार्यास वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी मदत देण्याची तयारीही दर्शविली. वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी जल प्राधिकरणच्या निरूपयोगी पाण्याचा वापर टेकडीवर वृक्ष संवर्धनाला करण्यासाठी प्रशासकीय मदतीबाबत विचारणा केली असता नवाल यांनी अनुकूलता दर्शविली. टेकडीवर जलसाठ्यासाठी तळे तयार करता यावे म्हणून वर्धेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचने केले. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे श्रमदान करणारे तथा एमएसएमआरचे सदस्य उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी) टेकडीवर जलसाठ्यासाठी केले जाताहेत प्रयत्न वैद्यकीय जनजागृती मंचाने भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन हनुमान टेकडीवर जल पुनर्भरण प्रकल्प राबविला. यात श्रमदानातून चर तयार करून वृक्षारोपणही केले. शिवाय तारांचे कुंपणही करण्यात आले. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल व न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी भेट देत पाहणी केली. याप्रसंगी वृक्ष संवर्धनासाठी टेकडीवर जलसाठा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून जलपुनर्भरण प्रकल्पाची पाहणी
By admin | Published: July 22, 2016 1:53 AM