वायगाव (निपाणी) : मीरापूर शिवारातील बालू मीरापूरकर यांच्या शेतात भानुदास विठोबा इंगळकर (४७) रा. मीरापूर यांचा मृतदेह आढळला. त्यांचा चेहरा काळा पडला होता शिवाय त्याच्या अंगावर शर्ट नसल्याने यात घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघड झाली.घटनेची माहिती अल्लीपूर पोलिसांना दिली असता त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सेवाग्राम रुणालयात पाठविला आहे. शरीरावर मारहाणीच्या कुठल्याही जखमा नसल्याने व प्रथमदर्शी पुराव्यावरून यात घातपात झाल्याचे दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरी उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर काय ते समोर येईल असे ठाणेदार पिदूरकर यांनी सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार, भानुदास इंगळकर हा सोमवारी सकाळी ९.३० वाजता घरून तहसील मध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या कामानिमिंत्त गेला. त्यानंतर त्यांच्या पुतणीच्या लग्नासाठी मोठा भाऊ व नातेवाईकाला भेटून मंगल कार्यालयाचे बुकींग केले. त्यानंतर त्याचा मोठा भाऊ व नातेवाईक गावी परत आले. त्यांच्यासोबत भानुदास नव्हता. तो नंतर येणार असे वाटले; मात्र तो घरी परतला नाही. त्याच्याशी घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद दाखवित होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान शेतात जात असलेल्या शेतकऱ्यांना भानुदासचा मृतदेह पडून दिसला. त्यांच्या अंगावर शर्ट बनियान नव्हती. मृतदेहापासून सुमारे तीन शेतांच्या दूर एक झोपडीत त्याचे शर्ट अटकून होते. तेथून एक शेत दूर त्याची दुचाकी उभी होती. त्याचा चेहरा काळा पडला होता. भानुदास बांधकामाचे कंत्राट घेत होता शिवाय तो राजकारणातही सक्रिय होता. शिवाय नेरी येथील स्वस्त धान्य दुकान हे स्वत:च्या बचत गटामध्ये घेण्याची प्रक्रिया चालू होती. त्याच्या पुतणीचे लग्न काही दिवसावर असताना तो आत्महत्या करणे शक्य नसल्याची चर्चा गावात आहे. यामुळे येथे घातपातच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र जोपर्यंत शव विच्छेदन अहवाल येणार तोपर्यंत काही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर, एस.सी. भोयर, शेखर डोंगरे करीत आहेत. (वार्ताहर)आत्महत्या नसून घातपाताची चर्चा ४मृतदेह, कपडे व दुचाकी या तिघात असलेले अंतर प्रत्येकी एक ते दोन शेताचे आहे. या सर्व ठिकाणी दुचाकी येऊ शकते. स्वस्त धान्य दुकान नेरीतून स्वत:च्या बचत गटाला मिळविण्याच्या कामाकरिता तहसीलमध्ये गेला. त्याचा मोबाईलही बंद असल्याचे दिसून आले. भानुदासचा मृतदेह मीरापूरकरच्या शेतात आढळला. त्याचे शर्ट हे देवीदास सातपुते यांच्या शेतात होते. तर दुचाकी संजू पांडेच्या शेतात होती. शवविच्छेदन अहवालानंतर सत्याचा उलगडा ४मृतदेहावर कुठल्याही जखमा नाही. शिवाय हत्येबाबत कुठलाही पुरावा नाही. यामुळे सर्वांच्या नजरा शवविच्छेदन अहवालावर लागून आहे. पोलिसांचा तपासही त्यावरच अवलंबून आहे. मृतदेहावर कुठल्याही जखमा नाही. शिवाय तसे कुठले पुरावेही दिसले नाही. यामुळे त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असा संशय आहे. यामुळे शवविच्छेदन अहवालानंतरच काय ते सत्य समोर येईल.- भानुदास पिदुरकर, ठाणेदार अल्लीपूर
मीरापूर शिवारात संशयास्पद मृतदेहामुळे खळबळ
By admin | Published: March 16, 2016 8:38 AM