जिल्हा समादेशकांची माहिती : बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाकडून पत्र घेण्यास नकार वर्धा : गृहरक्षकांची सेवा समाप्ती व पुनर्नोंदणीच्या जाचक अटीविरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाच्या नावाखाली वर्धेतील गृहरक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा शुक्रवारी सातवा दिवस आहे. यातच शासनाने या दोन्ही मागण्या मान्य करून शासन आदेशातील त्या अटींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी कळविले आहे. तसे पत्र पोलिसांमार्फत आंदोलकांना देण्याचा प्रयत्न झाला असता त्यांनी तो घेण्यास नकार दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे पोलिसांकडून ते पत्र आंदोलनस्थळी वाचून दाखविण्यात आले. दोन मागण्या मान्य केल्याचे महासमादेशकांनी कळविले आहे; मात्र तसे पत्रक काढून ते पाठविले नाही. या दोन मागण्यांव्यतिरिक्त इतर मागण्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. यामुळे शासनाकडून आलेले पत्र परत पाठविण्यात येत असल्याची माहिती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाचे ठमके यांनी दिली. या आंदोलनात बाहेर जिल्ह्यातील आंदोलकांची संख्या वाढत आहे. बाहेर जिल्ह्यातून एकूण ३२५ गृहरक्षक आतापर्यंत दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. तेही उपोषणात सहभागी होत असून शुक्रवारी चार जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असून ती आता २४ झाली आहे. राज्य शासनाने १२ वर्षे सेवा झालेल्या गृहरक्षकाच्या सेवा समाप्ती आणि पुनर्नोंदणीबागत घातलेल्या जाचक अटींच्या विरोधात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. गत सात दिवसांपासून गृहरक्षकाचे उपोषण सुरू आहे. यात आतापर्यंत एकूण १९ गृहरक्षक रुग्णालयात दाखल झाले आहे. याची दखल घेत महासमादेशकांनी गृहरक्षकांच्या मुख्य मागण्या मान्य करीत इतर मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी गृहरक्षकाच्या शिष्टमंडळाला होमगार्ड महासमादेशक राकेश मारिया यांनी सोमवारी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही चर्चा दुपारी ३ वाजता होणार असून न्यायप्रविष्ट बाबीच्या व्यतिरिक्त इतर बाबीवर चर्चा करण्यास ते तयार असल्याचे त्यांनी कळविले आहे. तत्पूर्वी ८ जुलैला गृहरक्षकांच्या शिष्टमंडळाने महासमादेशक यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार महासमादेशक यांनी १२ वर्षांच्या शासननिर्णयाच्या अंमलबजावणी व पुनर्नोंदणीच्या अटीबाबतही स्थगिती दिली असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)
निर्णयातील ‘त्या’ दोन अटींना शासनाकडून स्थगिती
By admin | Published: July 23, 2016 2:35 AM