लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.भाजपाचे पं. स. उपसभापती धनंजय रिठे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पं.स.च्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे होते. त्याच्या अध्यक्षतेत विशेष सभा पार पडली. उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या कांनगाव गणाच्या सदस्या सुवर्णा भोयर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर सत्तारूढ भाजपाच्यावतीने डॉ. विजय परबत यांनी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांना आठ मत तर डॉ. परबत यांना सहा मत पडली. भोयर यांना सर्वाधिक मत मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. सदर विजयानंतर सुवर्णा भोयर यांच्या समर्थकांसह काँग्रेस व राकाँच्या पदाधिकाºयांनी विजय साजरा केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, माजी आमदार राजू तिमांडे, ज्येष्ठ सहकार नेते अॅड. सुधीर कोठारी, शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे यांच्या उपस्थितीत सुवर्णा भोयर यांचा सत्कार करण्यात आला. हिंगणघाट पंचायत समितीत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळविता आली. परंतु, या उपसभापतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेस, राकाँ, शिवसेना व शेतकरी संघटना एकत्र आल्याने भाजपाला पराभवाचे मुख बघावे लागले आहे. शिवाय मोठा धक्काच बसल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पं.स.च्या निवडणुकीत भाजपला सात जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस ३, राकाँ २, सेना व शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागेवर विजय मिळविला होता. त्यावेळी समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती. यात सभापती व उपसभापती हे दोन्ही पद भाजपाकडे गेले होते. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्या वेळी मिळाला होता ईश्वर चिठ्ठीने विजयपं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी झालेल्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीत समसमान सात मत पडल्याने शेवटी विजयाचा विषय ईश्वर चिठ्ठीने मार्गी लावण्यात आला होता. यावेळी भाजपाचे दोन्ही उमेदवार ईश्वरचिट्ठीने विजयी झाले होते. उपसभापती रिठे यांचे निधन झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात भाजपाला धक्काच बसला.
पं.स.च्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या सुवर्णा भोयर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:48 PM
स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
ठळक मुद्देदोन मतांनी विजय : पं.स.सभागृहात पार पडली विशेष सभा