लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. विदर्भ कार्यकारिणीच्या बैठकीसाठी वर्धा येथे आले असताना खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले. एनडीए सोबतचे संबंध आपण तोडले असून गेल्यावेळी एनडीएला कार्यक्रमावर आधारीत पाठींबा देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता स्वाभिमान शेतकरी संघटना एनडीए व इतर विरोधी पक्षांपासून अंतर राखून काम करीत आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविली जाणार आहे. राज्यात सात जागांवर स्वाभिमान शेतकरी संघटना आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये लोकसभेच्या कोल्हापूर, हातकंगणे, माढा, सांगली, बुलढाणा, वर्धा, नंदूरबार या जागांचा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.केंद्रीय कृषी मुल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देण्यात यावी ही प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे व दीडपट हमी भाव देण्यात यावा,यासाठी आपण खासगी विधेयक लोकसभेत मांडले आहे. देशातील २३ पक्षांनी या विधेयकाला पाठींबा दिला आहे. हे विधेयक सरकारकडून मांडले गेले पाहिजे अशी आपली मागणी आहे. याला इतरही राजकीय पक्षांनी पाठींबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकऱ्याला चळवळीचा आधार देण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना आता सक्रीय झाली असून येत्या आॅक्टोबर महिन्यात कापूस, मुंग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या भावासाठी वर्धेतून आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
हमीभावाचे थोतांडच; व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने घातले शेपूटदीडपट हमीभावाची घोषणा करण्यात आली असली तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मुंगाला ६ हजार ९७५ हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या ४ हजार ३०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे. तसेच उडीदाला ५ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये दिले जात आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन २० लाख टनापेक्षा कमी झाले होते. त्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु व्यापाऱ्यांशी संगणमत करून सरकारने भाव पाडले. त्यामुळे १ हजार १०० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीन विकावे लागले. असे खासदार शेट्टी सांगितले. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीत सोडून सरकार पसार झाले असा आरोपही त्यांनी केला.
उच्च तंत्रज्ञानाला विरोध नाही मात्र भरपाईची हमी हवीस्वाभिमान शेतकरी संघटनेने शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाला कधीही विरोध केला नाही. भारतीय शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलेच पाहिजे अशी आपली भूमिका आहे. मात्र विदर्भात बोंडअळीने कपाशी पिकाचे नुकसान झाल्यावर कुठल्याही कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. उच्च तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. असेही खासदार शेट्टी म्हणाले. स्वाभिमानच्या आंदोलनानंतर काही भागात कृषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रवीकांत तुपकर, प्रा.डॉ. प्रकाश पोकळे, रवी पडोळे आदी उपस्थित होते.