अपघातांत वाढ : भाविकांमध्ये असंतोषपोहणा : तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते सुस्थितीत असावेत, अशी भावना असते; पण नेमके महत्त्वाचेच रस्ते दुरवस्थेत असल्याने पर्यटकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागतो. पोहणा येथून आजनसरा देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. केवळ खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघातांत वाढ झाली आहे. याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.पोहणा ते आजनसरा या महत्त्वपूर्ण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वळणावर असलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. पोहणा येथे वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाश्यांना हा मार्ग जवळ आहे. परिणामी, रहदारी वाढली आहे. पोहणा व आजनसरा हे तीर्थक्षेत्र याच मार्गावर असून हा रस्ता पोहणा येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आला आहे. यामुळे या मार्गाने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पोहणा ते आजनसरा हा रस्ता अरूंद असून रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. जागोजागी खड्डे पडले असून वळणावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. यामुळे भाविकांत असंतोष असून रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे.(वार्ताहर)
पोहणा ते आजनसरा रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: March 17, 2016 2:51 AM