लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यासह शहरात मागील आठवडा भरता कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शनिवारी सायंकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलीस दलातील ३५ अधिकारी आणि ५०० कर्मचारी रस्त्यावर उतरून सेवा देणार आहे. संचारबंदी काळात नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ३६ तासांच्या संचारबंदीसाठी पोलीस दलासह, आरोग्य विभाग, महसूल प्रशासनासह नगरपालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण देशात कहर केला. अनेकांना या जीवघेण्या विषाणूने आपल्या कवेत घेतले होते. देशासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असताना मागील वर्षीच्या मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केले होते. तब्बल नऊ महिने नागरिक घरातच लॉक झाले होते. संपूर्ण व्यवहार, वाहतूक ठप्प झाली होती. इतकेच नव्हेतर जिल्ह्याच्या सीमादेखील सील करण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यापासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश आल्याने पुन्हा सर्व स्थिती पूर्वपदावर आली असताना २०२१ वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली. जी रुग्णसंख्या १० ते १२ वर होती ती आता शंभरावर पोहचली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यात दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा ३६ तासांची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग, नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. सायंकाळपासूनच पोलीस यंत्रणा नियमोल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करत असल्याचे दिसून आले.
सोमवारपर्यंत सेवाग्राम आश्रम राहणार बंद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संचारबंदी घोषित केली आहे. यात जागतिक प्रसिद्ध सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम संचारबंदीकाळात पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गत येणारी दुकाने, यात्री निवास, आहार केंद्रदेखील बंद ठेवण्यात येणार आहे. हा बंद सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती अध्यक्ष टि.आर.एन.प्रभु यांनी दिली आहे.