सरपंच संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर आर्वी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथावर आक्षेपार्ह व बदनामीकारक पुस्तक लिहिणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच ज्या पुस्तकातून ही बदनामी करण्यात आली त्या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी एका निवेदनातून वर्धा जिल्हा सरपंच संघटनेद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली. संपूर्ण भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ओळखले जातात. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी राष्ट्रउर्मीसाठी आयुष्य वेचले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांची मोलाची भूमिका होती. महाराष्ट्रात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. तुकडोजी महाराज व त्यांच्या ग्रामगीता या ग्रंथाचा एका पुस्तकातून आक्षेपार्ह लिखाण करून अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे सदर लेखकावर कठोर कारवाई व्हावी आणि त्या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मागणी वर्धा जिल्हा सरपंच संघटनेद्वारे निवेदनातून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना करण्यात आली. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद राऊत, गजानन भोरे, दुर्गानंद डोळस, अजय लोखंडे आदींसह यांचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामगीतेवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: August 14, 2016 12:23 AM