लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील कडक निर्बंध शिथिल करीत बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोस्ट ऑफिस, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे पोहोचविण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. असे असले तरी निकृष्ट व अप्रमाणित बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतमाल नेण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील कृषीशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निविष्ठा किंवा शेतीशी निगडित अवजारे पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती करून द्यावी. कृषी केंद्र चालकांना विविध कंपन्यांमार्फत खते, बियाण्यांचा पुरवठा करण्याकरिता निविष्ठा गोदामामध्ये उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला इंधन पुरवठा संबंधित पेट्रोल पंपधारकांनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बँका राहणार दोन वाजेपर्यंत सुरू
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना अडचण आल्यास याची जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते १ पर्यंत सूरू राहतील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप दिवसभर सुरू राहतील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बँका सुरू राहणार आहेत. पीक कर्जाचे प्रस्ताव शेतकऱ्यांना करता येणार आहेत.