लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील जलसंकटाची भविष्यातील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तातडीने उपाय योजना करण्यात करण्यात याव्या, अशा सुचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.वर्धा पं.स.च्या सभागृहात सोमवारी वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सभापती जयश्री गफाट, सुकेशीनी धनविज, संजय शिंदे, सरस्वती मडावी, राऊत, पं.स. सदस्य अमित गावंडे, महेश आगे, तहसीलदार मनोहर चव्हाण, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. मागील बैठकीचा आढावा घेत कोणती कामे घेण्यात आली याची माहिती घेऊन अनेक कामे का अपूर्ण राहली याबाबतची विचारणा याप्रसंगी आ. भोयर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. गणेशपूर, महाकाळ, साटोडा, वरुड, नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव (मेघे)े, सालोड, नटाला, नेरी पुनर्वसन, पालोती, कुरझडी या गावात प्रत्यक्षात सुरू असलेल्या योजना, बंद पडलेल्या योजनांची माहिती घेऊन नवीन उपाययोजना बद्दल जि.प., पं.स. सदस्य व सरपंच यांचे म्हणणे जाणून घेऊन तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश याप्रसंगी देण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या; पण त्यांना मोबदला देण्यात आला नसल्याचे काही सदस्यांनी लक्षात आणून दिल्यावर याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचविण्यात आले. नटाला व नेरी पुनर्वसन या गावांचा बैठकीच्या यादीत समावेश नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत ही नावे का सुटली याची चौकशी करण्याचे आदेशही यावेळी निर्गमित करण्यात आले. लोकसंख्येच्या आधारे पाणी टंचाईचा आराखडा करण्यात यावा, लोकसंख्येची जुनी आकडेवारी ग्राह्य धरू नये, आकड्यांच्या खेळामुळे नागरिक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्यक्ष काम कसे करता येईल या दृष्टीने नियोजन करण्याचे सांगण्यात आले. साटोडा येथील विहिरीचा गाळ उपसण्याचा विषया यावेळी चर्चीला गेला. बोरगावच्या तलावाचे खोलीकरण, रोठा तलावाचे पाणी सोडणे, गणेशपूर-पांढरकवडा येथील योजनेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी देण्यात आल्या.
जलसंकटाची दाहकता लक्षात घेऊन उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:29 PM
मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.
ठळक मुद्देपंकज भोयर : पाणी टंचाईवर आढावा बैठक