तहसीलदारांना निवेदन : भटके विमुक्त संघर्ष परिषदेची मागणीदेवळी : महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. असे असताना नियमबाह्य खदानीवर शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या खदान मालकावर कार्यवाही करून परिसरातील सर्व खदानी बंद कराव्या व पारधी समाजातील त्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्यावतीने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदनातून करण्यात आली.आगरगाव पारधी बेड्यावरील नियमबाह्य खदानीतील खोलवर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन शाळकरी मुलींचा करुण अंत झाला होता. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासनस्तरावर कोणत्याही हालचाली न झाल्याने समाजमनात रोष व्यक्त होत आहे. या परिसरात पारधी बेडा मागील २० ते २५ वर्षांपासून कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. असे असताना लोकवस्तीपासून ३० फुट अंतरावर खदानीला परवानगी कशी काय देण्यात आली, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खदानीतून दगड व मुरूम काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यांना इतर साहित्याने पूर्ववत भरण्याचा नियम आहे; पण या सर्व नियमांना फाटा देऊन पारधी वस्ती परिसरात खोलवर खड्डे खोदण्यात आले. मागील सात वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. या सर्व व्यवहारात खदान मालकाने लाखोचा मलिदा घशात घातला आहे. शासन स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांची भूमिकाही याबाबत संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, नियमबाह्य खदान मालकावर कार्यवाही करण्यात यावी, विकासापासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजातील कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तहसीलदार जाधव यांना भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे संयोजक किरण पारिसे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.(प्रतिनिधी)
‘त्या’ खदानीवर कार्यवाही करा
By admin | Published: August 29, 2016 12:35 AM