लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिच पाणी समस्या निकाली काढण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्याच एकूण नऊ विहिरी अधिग्रहित केल्या आहे. शिवाय एक नवीन टँकरचीही खरेदी केली आहे. सुमारे दहा टँकरद्वारे नागरिकांना पुरक पाणी पुरवठा करण्याचा मानस वर्धा न.प.चा असल्याचे सांगण्यात आले.वर्धा शहरातील रामनगर, तुकाराम वॉर्ड, जुनी म्हाडा कॉलनी, गांधीनगर, लक्ष्मीनगर, तारफैल, पुलफैल, स्टेशन फैल, दयालनगर, हिंदनगर, कृष्णनगर, जुना आरटीओ चौक परिसर आदी भागातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. परंतु, महाकाळी येथील ज्या धाम जलाशयातून सोडलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथून उचल करून नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो, तोच जलाशय यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाहिजे तसा भरला नाही. शिवाय हिवाळ्याच्या दिवसातच भविष्यातील पाणी समस्या लक्षात घेता धाममधील उपलब्ध पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. परिणामी, सध्या वर्धेकरांना न.प. प्रशासन नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहेत. भविष्यात ही पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने नागरिकांना टँकरनेही पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याच विहिरींमधील पाण्याची उचल करून त्या पाण्याचा पुरवठा दहा टँकरच्या सहाय्याने नागरिकांना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. वर्धा शहरातील रामनगर जैन मंदिर परिसरातील विहिरींनी आतापर्यंतच्या दुष्काळी परिस्थितीत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी याच भागातील विहिरींनी तळ गाठल्याने वर्धा शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; पण त्यापैकी केवळ चार उपयोगी पडणार आहेत.पालिकेकडे तीन टँकरवर्धा नगरपरिषद प्रशासनाकडे पूर्वी दोन टँकर होते; पण नवीन एक टँकरची खरेदी करण्यात आल्याने ही सध्या आता तीन इतकी झाली आहे. असे असलेले तरी जलसंकटावर मात करण्यासाठी दहा टँकरने वर्धेकरांना पाणी पुरवठा करण्याचा मानस उराशी बाळगणारा न.प. प्रशासन आणखी सात टँकर भाडेतत्त्वावर घेणार आहे.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:00 PM
स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देएक टँकरची खरेदी : दहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा मानस