लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आपत्तीकाळाने शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सानुग्रह अनुदान मंजूर करावे. तसेच याकरिता शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले आहे. अशी अभूतपूर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी पूर्णत: हादरले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्याला प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. सोयाबीन काढण्याच्या ऐन दिवसात आलेल्या पावसामुळे शेंगातून अंकुर फुटले आहे. तसेच कपाशीच्या बोंडातूनही अंकुर फुटत असून कापूस ओला झाल्याने सडण्याची भीती आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्वच भागात बाजरी, ज्वारी, कांदा, संत्री, द्राक्षे, डाळिंब, मूग, उडीद, भुईमूग, करडई आदी पिकांची नासाडी झालेली आहे. या नासाडीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन उध्वस्त होण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव सानुग्रह अनुदान मंजूर करून सर्वतोपरी आधार द्यावा, याकरिता शिक्षक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजयकुमार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
या पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकारशेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, वर्षा केनवडे, राजन कोरगावकर, राजेंद्र नवले, केदू देशमाने, सयाजी पाटील, शिवाजी दुशिंग, राजेंद्र खेडकर, आबा शिंपी, राजेश सावरकर, राजेंद्र पाटील, सुधाकर सावंत, ज्ञानेश्वर नाकाडे, अशोक वैद्य, दयानंद कवडे, अंकुश गोफणे, पंडित नागरगोजे, संजय धामणे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, रामदास खेकारे, मनिष ठाकरे, अजय काकडे, प्रदीप तपासे, मनोहर डाखोळे, प्रशांत निंभोरकर, चंद्रशेखर ठाकरे, सुधीर सगणे, संतोष डंभारे, शीतल बाळसराफ, दीपक शेकार, ंसुनील वाघ, सुधीर ताटेवार, सीमा आत्राम, सुनीता डगवार, श्रद्धा देशमुख आदींनी पुढाकार घेतला आहे.