वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:12 PM2019-09-10T18:12:57+5:302019-09-10T18:16:23+5:30
वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
वर्धा - वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते कायम आपल्या विरोधात काम करीत आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांचे पहिले राजीनामे घ्या; त्यांनी जर आपल्या विरोधात प्रचार केला तर आपण रणजित कांबळेंच्या विरोधात जाहीरपणे मंचावर जाऊन प्रचार करू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दिला.
यासंदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांनाही माहिती दिली आहे. वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
यापूर्वी दोन विधानसभा निवडणुकीत रणजित कांबळे गटाच्या लोकांनी आपल्याविरोधात जाहीर प्रचार केला व आपला पराभव केला. हीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता आहे. रणजित कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष तशी जाहीर वाच्यता करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात निवडणूक लढणे योग्य होणार नाही. त्यामुळे पक्षाने वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थक असलेल्या पदाधिका-यांचे राजीनामे घेऊन त्यांना कार्यमुक्त करावे; देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात जाहीररीत्या रणजित कांबळे यांच्या विरोधात सभा घेऊन प्रचार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता काँग्रेस या सदंर्भात काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मागील दोन विधानसभा निवडणूकीत आपण रणजीत कांबळे समर्थकांनी विरोधात काम केल्यामुळे पराभूत झालो. आताही तीच वेळ येवू शकते. सेलूचे तालुकाध्यक्ष विजय जयस्वाल जाहिररीत्या आपले काम करणार नाही, असे वक्तव्य करीत आहे. त्यामुळे कांबळे समर्थक सर्व पदाधिकाºयांचे राजीनामे घ्यावे, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे.
- शेखर शेंडे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.