वर्धा सोशल फोरमचा सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबावर्धा : सेलू तालुक्यातील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे अद्याप दिलेले नाही. त्यामुळे सदर थकीत चुकारे मिळण्यासंदर्भात तसेच दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी नागपूरातील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू आहे. वर्धा सोशल फोरमद्वारेही सदर आंदोलनाला पाठिंबा देत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. ४०० शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे थकीत चुकारे त्वरीत मिळावे यासाठी किसान अधिकार अभियानद्वारे गत अकरा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु प्रशासकीय अनास्थेमुळे अद्यापही या आंदोलनाची योग्य दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांवर अन्याय होतच आहे. कृषी मालाची बाजारपेठीय पिळवणूक थांबविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. पण प्रशासन ही भूमिका योग्यरित्या पार पाडत नसल्याने सामाजिक संघटनांना संघर्ष करावा लागत आहे. कापसाच्या थकीत चुकाऱ्याबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी तत्काळ कापूस उत्पादकांचे थकीत चुकारे देत टालाटुलेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला केली आहे.(शहर प्रतिनिधी)
टालाटुलेवर कठोर कारवाई करा
By admin | Published: March 10, 2016 2:58 AM