भारतीय विद्यार्थी सेना : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.पोलीस प्रशासन हे जनतेचे सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाते. साऱ्या जनतेचे रक्षक हे पोलीस आहेत. कुठलीही सण असोत. चोवीस तास जनतेच्या सुरक्षिततेसाठी राबराब राबत असतात. जनता आनंदाने व उत्साहाने परिवारांसोबत सण साजरे करीत असताना तो मात्र आपल्या परिवार सोडून जनतेच्या सुरक्षेसाठी गस्त घालत असतो. जेव्हा अपघात होतो, दरोडा पडतो, छेडखानी किंवा चोरी होते, मारामाऱ्या होतात तेव्हा सगळ्या जनतेला पोलिसांचाच आधार घ्यावा लागतो व पोलीसही समस्या सोडवायला अर्ध्या रात्री धावून येतात. पण सध्या महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, या बाबत निवेदनातून निषेधही नोंदविण्यात आला. पोलीस विलास शिंदे हे त्यांना झालेल्या मारहाणीत शहीद झाले. धुळ्यामध्येही एका जमावाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटना महाराष्ट्रासाठी अशोभनीय असल्याचे नमूद केले आहे. शिष्टमंडळात भाविसे जिल्हा संघटक निरज बुटे, उपजिल्हा संघटक अजिंक्य मकेश्वर, जिल्हा सचिव अमर बेलगे, तालुका संघटक शंतनू भोयर, शहर संघटक अमेय देवगडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दृष्यांत ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2016 2:20 AM