खापरी (ढोणे) ग्रामस्थांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या खापरी (ढोणे) येथील प्रफुल खुशाल इंगळे गत काही दिवसांपासून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या उपद्रवाचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून खापरी (ढोणे) येथील ग्रामस्थांनी केली आहे.निवेदनातून, प्रफुल इंगळे हा खापरी (ढोणे) येथील रहिवासी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने गावातील मारोती धुर्वे यांच्याशी वाद करून त्यांना मारहाण केली. त्याबाबत दहेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावेळी प्रफुलने आपल्या हाताला पावशी मारून स्वत:ला जखमी करून घेतले. इतकेच नव्हे तर प्रफुलने प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांना चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तो कर्तव्यावरील शिक्षकाच्या मागे चाकू घेऊन धावला होता. याचीही तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. गावातील काही तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने प्रफुलने स्वत:च्या पत्नीला खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे निवेदनात नमुद आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक व गावातील महिलांना अश्लिल शिविगाळ करणे हे प्रफुलचे नित्याचेच काम आहे. तो नेहमीच ग्रामस्थांना धकमी देतो. प्रफुल इंगळे याच्या मनमर्जी कारभाराने कळस गाठल्याने गावातील शांतता भंग होत आहे. प्रफुल इंगळे याच्यावर कठोर कारवाईची मागणी आहे.ग्रा.पं.त घेतला ठरावगावातील शांतता भंग होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रफुल इंगळे याच्यावर कायमस्वरूपी गावात येण्यास बंदी घालण्याची कारवाई करावी असा ठराव खापरी (ढोणे) ग्रा.पं.त सरपंच अरुणा खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या विशेष सभेत घेण्यात आला आहे. या ठरावाची प्रतही निवेदन देताना ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सादर केली आहे.
‘त्या’ उपद्रवी तरुणावर कठोर कारवाई करा
By admin | Published: July 11, 2017 1:02 AM