वर्धा : भुदानमध्ये मिळालेल्या वडीलोपार्जीत शेतीचा पडताळणी अहवाल भुदान यज्ञ मंडळाला पाठविण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारताना लाचखोर तलाठी प्रवीण माधव भेले रा. संबोधीनगर गणेशनगर रोड हिंगणघाट याला कारंजा तहसिल कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनीअटक केली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी हे भिवापूर हेटी येथील रहिवासी असून त्यांच्याकडे शासनाकडून भुदानात मिळालेली वडीलोपार्जीत शेती भिवापूर हेटी येथे शेत सर्वे क्र. ७८ मध्ये ८.५ एकर शेती आहे. लाचखोर तलाठी प्रवीण भेले याने तक्रारदाराला वडीलोपार्जीत भुदानात मिळालेल्या शेतीचा पडताळणी अहवाल भुदान यज्ञ मंडळाला पाठविण्यासाठी ३ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ८ रोजी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिसांनी पडताळणी व सापळा रचला असता लाचखोर तलाठी प्रवीण भेले याने कारंजा येथील तहसील कार्यालयात तीन हजार रुपये स्विकारताना रंगेहात मिळून आला.
पोलिसांनी लाचखोर तलाठ्याला अटक करुन कारंजा ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, सचिन कदम, पोलिस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे, पोलिस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप मुपडे, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, प्रितम इंगळे, निलेश महाजन यांनी केली.