विधी मंत्रालयाची मंजुरी : ठाणे आष्टी तालुक्यात, न्यायालय होते आर्वी तालुक्यात आष्टी (शहीद) : तळेगाव पोलीस ठाणे आष्टी तालुक्याच्या हद्दीत असताना ते गत काही वर्षांपासून आर्वी न्यायालयाला जोडले होते. यामुळे पोलिसांना तालुकास्थळ बदलाचा मोठा फटका बसत होता. आता या पोलीस ठाण्याला आष्टी न्यायालयातच वर्गीकरणाला विधी मंत्रालयाने मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे आता आष्टी पोलिसांना आर्वी न्यायालयात जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. तळेगाव पोलीस ठाणे स्थापन झाल्यानंतर या ठाण्याच्या हद्दीत आष्टी तालुक्यातील एकूण २२ गावे व कारंजा तालुक्यातील काही गावे अशी एकूण ३८ गावे या ठाण्याला जोडण्यात आली आहे. आष्टी तालुक्याचे क्षेत्रफळ आधीच लहान असून तालुक्यातील २२ गावे जोडल्याने आष्टी न्यायालयामध्ये प्रकरणे कमी झाली. त्यामुळे कामकाजावर फरक जाणवत होता. तळेगाव पोलीस ठाण्याला जोडण्यात आलेल्या गावाची दिवाणी प्रकरणे आष्टी न्यायालयात असल्याने लोकांना दोन न्यायालयात हजेरी लावणे अशक्य होते. तसेच पक्षकारांना आर्वी न्यायालयाकरिता अतिरिक्त २५ ते ३० कि़मी.चे अंतर कापून आर्थिक फटका सहन करावा लागत होता. यात वेळेचाही अपव्ययही होत होता. यामुळे तळेगाव पोलीस ठाणे आष्टी न्यायालयाला जोडण्याची जनतेची मागणी होत होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावसुद्धा घेतले. अॅड. गायकवाड यांनी जिल्हा न्यायालयातून संबंधित कागदाची सर्व पूर्तता केली. त्या आधारावर आष्टी वकील संघाने शासनाकडे वारंवार मागणी केली. त्या संबंधाने २०१५ च्या अधिवेशनात आष्टी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मतले, अॅड. जाणे, अॅड. बेलेकर, अॅड. ठोंबरे, अॅड. गायकवाड, अॅड. अली या शिष्टमंडळाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विधी मंत्रालयाचे प्रधान सचिव यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर नागपूर हायकोर्टाचे व्हाईस चेअरमन अॅड. गोवरदिपे यांची सुद्धा भेट घेतली. याला एक वर्षाचा कालावधी लोटला तरी विशेष कार्यवाही झाली नाही. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अॅड. मनीष ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव विधी मंत्रालय यांची विशेष भेट घेऊन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या संबंधाने अधिसूचना प्रकाशित करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणाकडे विशेष लक्ष देवून प्रधानसचिवांना अधिसूचना प्रकाशित करण्याचे आदेश दिले. या अधिसूचनेनुसार १ जानेवारी २०१७ पासून तळेगाव पोलीस ठाण्याची सर्व प्रकरणे आष्टी न्यायालयामध्ये वर्ग करण्यात यावे, असे कळविले आहे.(तालुका प्रतिनिधी)
तळेगाव पोलिसांची प्रकरणे आता आष्टी न्यायालयात
By admin | Published: December 23, 2016 1:23 AM