आर्वी : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या आदेशानुसार नेहरू युवा केंद्र वर्धा व धरणग्रस्त बहुउद्देशीय युवा मंडळ पिंपळगाव (भोसले) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेजार युवा संसद व विकास कार्यक्रम घेण्यात आला़ मंगळवारी राजीव गांधी भवन पिंपळगाव येथे सदर युवा संसद पार पडली़ ग्रामीण युवकांनी शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमाबाबत परिपूर्ण माहिती मिळविली पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे व खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात स्वत: नेतृत्व स्वीकारून प्रशासनाला मदत केली पाहिजे, या उद्देशाने युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जीवन राऊत तर अतिथी म्हणून लेखापाल धरमलाल धुवारे, मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास अधिकारी पवन वाढई, पोलीस पाटील गणपत इंगोले, सचिव सतीश इंगोले, बजाज फाऊंडेशनचे निलेश सयाम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विषयतज्ञ कैलास बाळबुधे उपस्थित होते़ स्वच्छ भारत अभियान व निर्मल भारत मिशन, जनधन योजना, बेटी बचाव विषयावर उपस्थित युवकांना मार्गदर्शन करण्यात आले़ युवकांनी या युवा संसदमध्ये उत्सफूर्तपणे सहभागी होऊन सविस्तर चर्चा केली़ राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता त्यांच्या भूमिकेबद्दल कृती योजना तयार केली. ही कृती योजना वर्धा जिल्हा प्रशासनाकडे व नेहरू युवा केंद्र संघटन नवी दिल्ली यांच्याकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. युवा संसदेमध्ये ४० गावांतील ८० युवा मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय युथ कोअर व्हॉलिंटियर प्रिया पवार यांनी केले तर आभार शुभम इरपाचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशाकरिता मंगेश डुबे, विलास राऊत, प्रविण चौधरी, सूरज राऊत, योगेश इंगोले, अजय राऊत, सपना पवार, सोनाली पवार, मनोहर पाचभाये, सुरेश नेहारे, प्रफूल चौधरी आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
तालुकास्तर शेजार युवा संवाद व विकास कार्यक्रम
By admin | Published: March 27, 2015 1:29 AM