लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक हा कारकून, लेखापाल, शालेय पोषण आहाराचा दिवाणजीपणासाठी की केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आहे. याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात तालुक्यातील शिक्षकांनी केली असून याबाबतचे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.समग्र शिक्षा अभियानअंतर्गत एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची जन्मनोंदीपासून ते विद्यार्थ्यांच्या आजोबाच्या वंशावळीपर्यंत जात, धर्म, प्रवर्ग यासर्व प्रकारातील ४४ मुद्द्यांची माहिती पंचायत समिती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकाने भरावी, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांचे १२ एप्रील २०१८, २५ एप्रील २०१८ आणि ११ जुलै २०१८ चे पत्रान्वये राज्यातील सर्व शिक्षण विभागाला आदेश आहेत. मात्र, समुद्रपूरच्या पंचायत समितीतील गटसाधन कार्यालयाने हा आदेश धुडकावत शिक्षण विभागाच्या यंत्रणेद्वारे एसडीएमआयएस प्रणालीवर माहीती भरण्यास मुख्याध्यापकाच्या मागे ससेमिरा लावत आहे. बहुतांश शाळा ग्रामीण व दुर्गम भागात असल्याने इंटरनेटची सुविधा नाही. माहीती भरण्यास लागणारा कमालीचा विलंब या सर्व अशैक्षणिक कामात एकीकडे शिक्षकांना गुंतवून ठेवत आहे. तर दुसरीकडे शासन राज्यस्तरावर शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी टाळ कुटत असल्याचा आरोपही शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांचा हा जाच थांबवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शनिवारी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात पंचायत समितीवर मोर्चा काढून धडक देण्यात आली. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांच्यावतीने प्रशासन अधिकारी मोहन कुंभारे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी शिक्षक संघाचे विभाग प्रमुख अजय गावंडे, वामन शेळके, गोविंद अवगान, हेमंत पारधी, राहुल पाटील, कमलाकर ठाकरे, विशाल केदार, अनंत वांदीले, शंकर कोल्हे, शरद वाघमारे, अशोक खडसे, कपील खेकारे, आनंद मंगरुळकर, अरविंद महाकाळकर, सुनील मांडवकर, किशोर डेकाटे, विलास मेश्राम, पद्माकर भुरे, खिरदास चिकराम, दिनेश काटेखाये, गणेश शंडे याच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांची माहीती भरणे हे सर्वस्वी पंं.स.गटसाधन केंद्राचे काम आहे, असे शासनाचे आदेश असतांना शाळा मुख्याध्याकावर लादने अयोग्य आहे.मुख्याध्यापक आधीच विविध अशैक्षणिक कामाच्या चक्रव्यूहात भरडल्या जात आहे. त्यात प्रशासन अतिरीक्त काम लादत असेल तर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या अडचणी विनाकारण वाढविण्याचा प्रयत्न समजण्यापलीकडे आहे.- अजय गावंडे, विभागीय अध्यक्ष, प्रा.शिक्षक संघ,वर्धा जिल्हा.
शिक्षक शिकविण्यासाठी की ‘बाबुगिरी’साठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:52 AM
सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे.
ठळक मुद्देगुरूजींचा सवाल : मोर्चा काढून पं.स. प्रशासनाला निवेदन