लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात सुरुवातीपासून गुरुजींनी मजुरांची राहण्याची व्यवस्था करण्यासोबतच प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी समर्थपणे पेलली. आता कोरोना लसीकरणाच्या प्रायोगिक चाचणीमध्येही वर्ध्यातील तीन शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वत:वर लसीकरण करून घेत सामाजिक कर्तव्य बजावले आहे.
कोविड-१९ चा आजार होऊ नये म्हणून जगभरात संशोधन सुरू असून भारतातसुद्धा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ निर्मित (सीएच-डीओएक्स १ एनसीओव्ही-१९) लस प्रायोगिक तत्त्वावर देणे सुरू आहे. सेवाग्रामात लसीकरण चाचणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाल्याचे कळल्यावर राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तीन पदाधिकाऱ्यांनी प्रयोगशाळा संचालकांना विनंती करीत चाचणीची तयारी दर्शविली, ती मान्य झाली. त्यानंतर या तिन्ही शिक्षकांनी विविध चाचण्या पूर्ण करून लसीकरण करून घेतले. मानवी जीवनात कोरोनाने भयप्रद स्थिती निर्माण केली आहे, कोरोना संक्रमणापासून बचाव करण्याच्या या संशोधनपर प्रयोगात स्वेच्छेने सहभागी होण्याची संधी मोलाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
देशातील अठरा केंद्रांत सेवाग्रामचा समावेशभारतात तिसºया टप्प्यामध्ये एकूण १ हजार ६०० व्यक्तींवर लसीचा काय प्रभाव होत आहे, याचा अभ्यास सुरू आहे. भारतात १८ केंद्रावर प्रायोगिक चाचणी घेतली जात आहे. या १८ केंद्रामध्ये सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचा समावेश असून तेथे संशोधन सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदतर्फे या अभ्यासाची देखरेख केल्या जात आहे.