प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांत बाल लैंगिक शोषण समस्येबाबत जागरुकता निर्माण व्हावी, ते रोखता यावे म्हणून आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी संवेदनशील करावे, अशा सूचना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने (एनसीईआरटी) शिक्षकांना दिल्या आहेत. ‘चांगले व वाईट स्पर्श’ हा धडा प्राथमिक स्तरावर पर्यावरणाचा अभ्यास विषयात दिला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांत जागृती करण्यासही एनसीईआरटीने शिक्षकांना सांगितले आहे.बाल लैंगिक शोषणाबाबत जागृती व्हावी, प्रत्येक शालेय विद्यार्थी लैंगिक अत्याचार ओळखणे तथा त्याबाबत योग्य व्यक्तीला माहिती देण्यास सक्षम व्हावा यासाठी शालेय पुस्तकात माहितीचा अंतर्भाव करण्याची मागणी केली होती. यासाठी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर तथा विद्यार्थी अनघा इंगळे, मोहम्मद कादीर, सावित्री, गिरीशा, अन्विता, प्रीती, अनुरथी, डॉली, सुमेध, निखील व श्रीनिधी दातार यांनी एक २५ पानांचा अहवाल तयार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर व राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंदाला डिसेंबर २०१६ मध्ये पाठविला. यावर आजपर्यंतच्या कार्यवाहीची माहिती देण्यासह प्राथमिक शाळेतील मुलांत पोक्सो कायद्यांतर्गत बाल लैंगिक शोषण समस्येबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एनसीईआरटीने काय कार्यवाही केली, अशी विचारणा आरटीआय अंतर्गत केली होती. यावर एनसीईआरटीच्या प्राथमिक शिक्षणाचे प्रमुख ए.के. राजपूत यांनी ही माहिती डॉ. खांडेकर यांना ७ मे रोजी दिली. तसेच एनसीईआरटीची प्राथमिक स्तरावर ईव्हीएस (इंव्हायरॉनमेंटल सायन्स) शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली सामग्री शाळांद्वारे स्वीकारली जाऊ शकते, दत्तक व नव्याने डिझाइन केले जाऊ शकते, ज्यायोगे मुलांना त्यांच्या सुरक्षेविषयी संवेदनशीलतेची जाणीव होईल, असेही राजपूत यांनी सांगितले.३ एप्रिल २०१७ रोजी एनसीईआरटीने नवीन पुस्तके व अभ्यासक्रम तयार करताना अहवालात मांडलेले मुद्दे अभ्यासक्रम व पुस्तके सुधारणा समितीसमोर ठेवले जातील, असे डॉ. खांडेकर यांना कळविले होते. त्यानुसार अंतर्भाव करण्यात आला आहे. शिक्षकांनी ‘चांगला व वाईट स्पर्श’ याबाबत वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. यातून विद्यार्थ्यांत आत्मविश्वास व आधाराची भावना निर्माण होण्यास मदत होईल, अशा सूचनाही शिक्षकांना दिल्या. शिवाय शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक चर्चा करावी. समुपदेशकाचीही मदत घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.
‘कोमल’द्वारेही देता येणार शिक्षणबाल लैंगिक शोषण समस्येवर प्रकाश टाकणारी फिल्म ‘कोमल’ ही देखील एनसीईआरटीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या फिल्मचाही चांगल्या, वाईट स्पर्शाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपयोग करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या बहुतांश शाळा डिजिटल झाल्याने फिल्मच्या माध्यमातून अधिक जागृती होऊ शकणार आहे.
सध्याची पुस्तके माहिती देत नाहीसध्याची एनसीआरटीची व राज्यांच्या बोर्डाची पुस्तके लैंगिक शोषणाबाबत जागरुकता व्हावी म्हणून कुठलीही माहिती देत नाही. शालेय पुस्तकात योग्य माहिती दिल्यास विद्यार्थी, शिक्षक व पालक जागरुक होतील. वेळीच अशा अत्याचाराची माहिती योग्य व्यक्तीला देतील. यामुळे ते तीव्र व दीर्घकालीन अत्याचाराला बळी पडणार नाही, असेही शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद केले होते.देशातील बाल लैंगिक अत्याचाराच्या तसेच शाळांमध्ये होणाऱ्या या घटनांचे प्रमाण वाढले आहे. एनसीईआरटीने उचललेले हे पाऊल बाल लैंगिक शोषण समस्या कमी करण्यास मैलाचा दगड ठरणार आहे.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.