लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील मजूर महिलांना प्रशासनानं प्रवासाला परवानगी दिल्यानंतर त्या आता आपल्या गावी निघाल्या आहेत. या महिलांना शिक्षक संघटनेकडून साडीचोळी देऊन निरोप देण्यात आला.निवारा गृहात पाच आठवडे सांभाळल्यानंतर शनिवारी काही परप्रांतीय महिलांना साडीचोळी देवून शिक्षकांनी निरोप दिल्यावर महिलांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र वर्धा येथे पाहायला मिळाले.येथील न्यू इंग्लिश शाळेच्या निवारागृहात वाटेत अडकलेल्या मध्यप्रदेशच्या काही महिला मजुरांना थांबविण्यात आले होते. तसेच इतरही ९० मजूर होते. त्या सर्वांच्या दोन्ही वेळचं जेवण व चहा नाश्त्याची व्यवस्था राज्य शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली होती. त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने टप्याटप्याने त्यांना त्यांच्या प्रांतात सोडले जात आहे. आज दहा महिलांची निरोपाची वेळ होती. ३५ दिवस एकत्र राहल्याने शिक्षक व मजूर कुटूंब यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्याचा प्रत्यय आज आला.ज्येष्ठ शिक्षक नेते अनिल टोपले यांच्या पुढाकाराने सर्व महिला व मुलींना साडीचोळी देण्यात आली. आपली भावना व्यक्त करतांना एक महिला म्हणाली की, देवदूतासारखे आमच्या मदतीला शिक्षक लोक आले. आमच्या कुटूंबीयांनीसुध्दा लावला नसेल एवढा जीव तुम्ही लोकांनी लावला. कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. ही आठवण कायमची राहील. तर दुसऱ्या एका महिलेने आई-वडील नसल्याचे सांगत इतके दिवस जपणाऱ्या शिक्षक शिक्षिकाच आमच्यासाठी आईवडिलांसमान ठरल्या, त्यांनीच आम्हाला मुलीप्रमाणेच सांभाळले. जेवणच नव्हे तर प्रेमही दिल्याचे मत व्यक्त केले.